धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी; सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट

मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत चालले आहे. जून ते ऑगस्ट या हंगामात पावसाने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ओढ दिल्याने आता धरणे भरण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील इतर सर्व धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी; सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट
धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी; सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत चालले आहे. जून ते ऑगस्ट या हंगामात पावसाने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ओढ दिल्याने आता धरणे भरण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील इतर सर्व धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मराठवाडा भागातील बहुतांश सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली. १ जूनपासून गेल्या तीन महिन्यांमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केवळ ३८८.३ मिमी पाऊस झाला असून २९.७ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. या विभागाची पावसाची सरासरी ५५२.२ मिमी आहे.

सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित ३८.७ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ५.२ मिमी (१४ टक्के) पाऊस झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या अनुक्रमे ५७.३ टक्के आणि ५४.६ टक्के इतकाच (६० टक्क्यांहून कमी) पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विभागातील सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

मांजरा आणि माकणी यांसारख्या ज्या धरणांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी आहे, त्यातील पाणी आता केवळ पिण्यासाठी राखीव करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाणीसाठ्यांच्या संरक्षणासाठी गस्ती पथके तैनात करण्यात आली असून, बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणारे पंप जप्त केले जातील, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेजची काँग्रेसची मागणी

दीर्घकालीन कोरडा दुष्काळ, पावसाची तूट आणि 'एल निनो'च्या प्रभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी संकटात असल्याचे निदर्शनास आणून दिले.

सीना कोळेगाव धरण कोरडेठाक

मराठवाड्यात एकूण ११ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सध्या एकूण १२३.३२ टीएमसी म्हणजे ६७.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तो ९६.८२ टक्के इतका होता. धाराशिव येथील ३.१५ टीएमसी क्षमतेच्या सीना कोळेगाव प्रकल्पात सध्या शून्य टक्के साठा आहे. लातूर शहराला पाणी पुरवणाऱ्या मांजरा धरणात अवघा १२.२६ टक्के, तर परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात अवघा २२.४९ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी हाच साठा ७४.६७ टक्के होता.

रब्बीसाठी नियोजन नाही :

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पत्रकारांना सांगितले की, उपलब्ध जलसाठा पूर्णपणे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला जाईल आणि आगामी रब्बी हंगामासाठी सध्या कोणतेही नियोजन केले जाणार नाही. सप्टेंबर महिन्यानंतर पुढील हंगामाच्या नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in