कोरडं शिवार...अश्रूंचा पूर; मराठवाड्यात चाराटंचाई अन् पाणी प्रश्नही गंभीर, विभागातील १४२ गावे, ९१ वाड्यांत टंचाईच्या झळा तीव्र

पावसाची तूट आणि पाणीसाठ्याची दयनीय अवस्था असलेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत.
कोरडं शिवार...अश्रूंचा पूर; मराठवाड्यात चाराटंचाई अन् पाणी प्रश्नही गंभीर, विभागातील १४२ गावे, ९१ वाड्यांत टंचाईच्या झळा तीव्र
कोरडं शिवार...अश्रूंचा पूर; मराठवाड्यात चाराटंचाई अन् पाणी प्रश्नही गंभीर, विभागातील १४२ गावे, ९१ वाड्यांत टंचाईच्या झळा तीव्र 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

सुजित ताजणे

छत्रपती संभाजीनगर : पावसाची तूट आणि पाणीसाठ्याची दयनीय अवस्था असलेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. आठवडाभरात टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या ६५ ने वाढली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांची संख्या १४२, तर वाड्यांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, वाढलेली सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या बीड जिल्ह्यातील आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील १११ गावे आणि ५७वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६६ गावे व १४ वाड्या, जालना जिल्ह्यातील १२ गावे व ९ वाड्या, बीड जिल्ह्यातील २७ गावे व ३४ वाड्या, तर धाराशिव जिल्ह्यातील सहा गावांचा समावेश होता.

तथापि, २१ सप्टेंबरअखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांतील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गाव-वाड्यांची संख्या गत आठवड्याइतकीच कायम आहे. दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांची संख्या २७ वरून २१ सप्टेंबरअखेर ५८ वर, तर वाड्यांची संख्या ३४ वरून थेट ६८ वर पोहोचली आहे.

५१२ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील टंचाई निवारण्यासाठी सुमारे ५१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या ६७, तर टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या ४४५ विहिरींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९६, जालना २२ आणि धाराशिव जिल्ह्यात आठ टँकर सुरू आहेत. पाणीटंचाई तीव्र होत चाललेल्या बीड जिल्ह्यात १२० टँकरद्वारे टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

जालना, बीडमध्ये ६५ दिवसांचा चारा

अनेक जिल्ह्यांत हिरव्या चाऱ्याची तूट जाणवत असून सध्या १८८ दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यांत केवळ ६५ दिवसांचा चारा उपलब्ध आहे. तालुकानिहाय चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने चाऱ्यासाठी राज्यात सध्या हिरवा चारा २२.७९ टक्के, तर सुक्या चाऱ्यात २१.४३ टक्के तूट आहे.

पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान

राज्यात दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात चाराटंचाई निर्माण झाली असून, यंदा पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान आहे . त्यामुळे परतीच्या पावसावर आधारित चारा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक बियाण्यांचे तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक ३१७.४४ कोटी, तर २०२६ ते २०३० या कालावधीसाठी १५८७.२० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा पशुसंवर्धन विभागाने तयार केला आहे.

पाणीपुरवठ्याचे टँकर वाढले

गत आठवड्यात १९६ असलेली पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या २१ सप्टेंबरअखेर रोजी २४६ वर पोहोचली आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या २४६ टँकरमध्ये २४३ खासगी, तर केवळ तीन शासकीय टँकरचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in