

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना त्याचे परिणाम आता विद्यार्थ्यांनाही सहन करावे लागत आहेत. पाण्याचे स्रोत आटत चालल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पिण्यासाठी पाणी मिळविण्यापासून ते स्वच्छतागृहांच्या वापरापर्यंत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळांमध्येही पाणीटंचाई निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय अधिकच वाढते. कल्याणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रामुख्याने गरीब आणि ग्रामीण भागातील कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. या शाळेतील सुमारे २५ टक्के विद्यार्थी गावातील, तर तब्बल ७५ टक्के विद्यार्थी वाड्या-वस्त्यांवरून शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आधीच दुष्काळामुळे उन्हाची तीव्रता वाढलेली असताना, उन्हातून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. शाळेत पोहोचल्यानंतरही त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अवस्था बिकट होत आहे.
परसबाग सुकली; परिसर स्वच्छतेचाही प्रश्न
शाळेत पाणी उपलब्ध नसल्यामुळे शाळेची परसबागही सुकून गेली आहे. पाण्याअभावी हिरवळ नष्ट होत असून, शाळेचा परिसर भकास दिसू लागला आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणारी आणि पर्यावरणाबाबत जागरूक करणारी परसबाग पाण्याअभावी टिकविणे कठीण झाले आहे. दुसरीकडे, शाळेतील स्वच्छतागृहांसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसेल तर स्वच्छता राखणे कठीण होते. विशेषतः विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने हा प्रश्न अधिक संवेदनशील आहे. त्यामुळे शाळेतील पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक बनले आहे.
‘गरज भासल्यास टँकर किंवा अन्य पर्यायी माध्यमातून शाळेला पाणीपुरवठा करण्याचा विचार करावा. तसेच पत्र्याच्या वर्गखोल्यांतील उकाडा कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे. दुष्काळामुळे गावोगावी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये. पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि स्वच्छता धोक्यात येण्यापूर्वी प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. कल्याणीच्या जिल्हा परिषद शाळेतील २०० विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आता प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे’. - सुरेश दलसिंग कायटे, मुख्याध्यापक, जिप प्राथमिक शाळा, कल्याणी ता. भोकरदन, जि. जालना
पाणीटंचाई, असह्य उकाड्याशी सामना
दुष्काळाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असतानाच आता त्याचे गंभीर परिणाम शालेय विद्यार्थ्यांवरही होत आहेत. जालना जिल्ह्यातील कल्याणी येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून, दुष्काळाच्या झळा सहन करतच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. एकीकडे गावात पाण्याची टंचाई, दुसरीकडे पत्र्याच्या वर्गखोल्यांमधील असह्य उकाडा आणि तिसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अशा दुहेरी-तिहेरी संकटांचा सामना शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.
स्वच्छतेचा प्रश्नही बिकट :
शाळांमध्ये पाणी उपलब्ध नसल्यास स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे, हात धुणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांसारख्या मूलभूत बाबींवरही परिणाम होऊ शकतो. मुलींच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न अधिक संवेदनशील असून, पाण्याअभावी त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांमध्ये नियमित पाणीपुरवठा करणे ही केवळ सुविधेची बाब नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सन्मानाशी संबंधित गरज आहे.