दुष्काळ आवडे 'टँकर लॉबी'ला; नोंदणी वाढल्याने निर्मिती उद्योगाला तेजी

मराठवाड्यात दुष्काळाची चाहूल लागताच पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली असून, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही या छोट्याशा गावात टँकर निर्मितीच्या कामाला वेग आला आहे. गावातील बहुतांश गॅरेजमध्ये सध्या टँकर बांधणीची कामे सुरू असून, दुष्काळामुळे टँकर नोंदणीचा जोर वाढल्याने या व्यवसायाला तेजी आली आहे.
दुष्काळ आवडे 'टँकर लॉबी'ला; नोंदणी वाढल्याने निर्मिती उद्योगाला तेजी
दुष्काळ आवडे 'टँकर लॉबी'ला; नोंदणी वाढल्याने निर्मिती उद्योगाला तेजीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात दुष्काळाची चाहूल लागताच पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली असून, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही या छोट्याशा गावात टँकर निर्मितीच्या कामाला वेग आला आहे. गावातील बहुतांश गॅरेजमध्ये सध्या टँकर बांधणीची कामे सुरू असून, दुष्काळामुळे टँकर नोंदणीचा जोर वाढल्याने या व्यवसायाला तेजी आली आहे.

मादळमोहीतील सुमारे १० गॅरेजमध्ये दररोज टँकर निर्मितीची कामे सुरू आहेत. अहिल्यानगर आणि मुंबई येथून २० फूट लांबीचे पोलादी पत्रे आणले जात असून, या कच्च्या मालाची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गेल्या दोन आठवड्यांत सुमारे ५० ते ५५ टँकर तयार करण्यात आल्याचे गॅरेज व्यावसायिक सांगतात.

एक टँकर तयार करण्यासाठी साधारण २० फूट लांब, पाच फूट रुंद आणि तीन ते साडेतीन मिलिमीटर जाडीचे पोलादी पत्रे वापरले जातात. एका टँकरसाठी अशा आकाराचे सुमारे सहा पत्रे लागतात. मोठ्या पत्र्यांना आवश्यक तो आकार देऊन त्यापासून टँकर तयार केला जातो. त्यासाठी लागणारी मजुरीही वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

लोखंड दरवाढीचा किमतीवर परिणाम

मराठवाड्यातील टँकर निर्मितीसाठी लागणाऱ्या लोखंडी कच्च्या मालाचा मोठा व्यवहार अहिल्यानगरशी जोडलेला आहे. यंदा लोखंड आणि पोलादाच्या दरात वाढ झाल्याने टँकर निर्मितीचा खर्चही वाढला आहे.

कच्च्या मालाचा खर्च वाढण्याची शक्यता

पोलादाच्या विविध प्रकारच्या पट्ट्यांची निर्मिती व पुरवठा क्षेत्रातील उद्योजक तसेच सीआयआयचे माजी अध्यक्ष रमण आजगावकर यांच्या म्हणण्यानुसार, लोखंडाच्या दरात सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहन उद्योगासह विविध क्षेत्रांत धातूच्या पट्ट्यांची मागणी वाढल्याने दर चढे राहिले आहेत. त्यामुळे टँकर निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन आठवड्यांपासून मागणीत वाढ

गॅरेज व्यावसायिक सुभाष पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरात त्यांच्या भागात साधारण २०० ते २५० टँकर तयार केले जातात. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या दिवसाला किमान एक टँकर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. १० टायरच्या टँकरची किंमत सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून, १२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरची किंमत १ लाख ३० हजार रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.

आठ दिवसांत टँकर होतो तयार

मादळमोही परिसरात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे जुन्या टँकरच्या दुरुस्तीचे काम अधिक होते. मात्र, यंदा पावसाचा खंड वाढत गेल्याने नवीन टँकरची मागणी वाढू लागली आहे. टँकरची नोंदणी केल्यानंतर साधारण आठ दिवसांत टँकर तयार करून दिला जात असल्याची माहिती कामगार भीमराव जाधव यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in