

छत्रपती संभाजीनगर : यंदा ‘एल-निनो’चा इफेक्ट जाणवत असल्याने देशाच्या विविध भागात पावसाचे संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस पडला तरीही मराठवाडा विभागात या वर्षी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत १८ टक्के कमी पाऊस झाला असून, लातूर आणि परभणी हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.
परिणामी, या भागातील ११ मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ६९.०६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील बहुतांश भाग हा दुष्काळप्रवण मानला जातो. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मान्सूनच्या काळात २० ऑगस्टपर्यंत या विभागात ४७५.१ मिमी (१०६.८ टक्के) पाऊस झाला होता, तर वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण ४४४.९ मिमी होते. मात्र या वर्षी मराठवाड्यात केवळ ३६५ मिमी पाऊस झाला आहे, जो अपेक्षित पावसाच्या फक्त ८२ टक्के आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. येथे ३७६.६ मिमी या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ३८४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ४०.५ टक्के आणि परभणीत ३२.२ टक्के पावसाची घट नोंदवली गेली आहे.
लातूरची वार्षिक सरासरी केवळ २६९.६ मिमी पाऊस झाला आहे. तर परभणीमध्ये सरासरीच्या तुलनेत ३४६.६ मिमी (६७.८ टक्के) पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ६९.०६ टक्के म्हणजेच १२५.७५ टीएमसी पाणीसाठा उरला आहे.
सीना कोळेगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा
धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे, जो गेल्या वर्षी ९३.७३ टक्के होता. बीडच्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा त्याच्या एकूण क्षमतेच्या केवळ १४.८९ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो ९५.५४ टक्के होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पीक जगवण्याचे संकट उभे राहिले आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण पाऊस न पडल्यास वर्षभर पाणी कसे प्यायचे याचीच चिंता नागरिकांना आहे.