Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

गेल्या आठ दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मदतीची मागणी सुरू असतानाच मराठवाड्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत रात्रभर पाऊस पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून सखल भागातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत.
Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत
Published on

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठ दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले असून लाखो नागरिकांच्या घरादारात पाणी शिरले आहे. पूरग्रस्तांसाठी सरकारकडून मदतीची मागणी सुरू असतानाच मराठवाड्यात पुन्हा 'कोसळधार' सुरू झाली आहे. धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात रात्रभर पाऊस पडत आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागांतील गावांचा संपर्क तुटला आहे. सखल भागातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत.

गेल्या ८ ते १० दिवसांपासून मराठवाडा, सोलापूर, विदर्भ, नांदेड परिसरात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतातील पीक आडवे झाले असून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. अनेक घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी वस्तू नष्ट झाल्या आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे आता सावरायचे कसे ? असा प्रश्न पूरग्रस्तांसमोर उभा आहे. अनेक विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे वाहून गेली असून भविष्य अंधारमय झाले आहे. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून अनेकांच्या संसाराची वाताहात झाली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून गेल्याने जेवण कसे करायचे असा प्रश्न अनेक घरांमध्ये आहे.

हिंगोलीत कयाधू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठची शेकडो एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. गावात पाणी शिरल्याने दाणादाण उडाली आहे.

बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका दिवसात सर्वाधिक १४३ मिमी पाऊस झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तीन गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने तीन गावे पाण्याने वेढली गेली. वसमत तालुक्यातील चौंधी बहीरोबा आणि कळमनुरी तालुक्यातील बिबथर व कोंधूर दिग्रस या गावांचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे.

पोलीस ठाणे पाण्याखाली

मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले असून बीडचे ग्रामीण पोलीस ठाणे पाण्यात गेले आहे. त्यामुळे तेथील कामकाज सकाळपासून बंद आहे. माजलगावच्या बडेवाडी जिल्हा परिषद शाळेतही पावसाचे पाणी साठल्याने शाळेला तळ्याचे स्वरूप आले आहे.

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले की, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते बंद केले आहेत. मांजरा नदी धोकादायक पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे पाऊस सुरू राहिला, तर नदीकाठच्या काही शेतांमध्ये पाणी घुसू शकते. बचाव पथके सज्ज असून अडकलेल्या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने जोरदार पावसामुळे काही रस्ते बंद केले आहेत. भूम आणि परंडा तालुक्यांत बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) तैनात करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

२० सप्टेंबरपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पूरग्रस्त नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, किमान नऊ जणांचा बळी गेला आहे आणि लाखो एकरांवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील प्रेरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक गावांना महापुराचा वेढा पडला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांमध्ये कंबरभर पाणी साचले आहे. चिखलातून सोयाबीन काढणे अशक्य झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा - राजू शेट्टी

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे मान्य केले आहे. हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठीचा मोठा पुरावा असून, दुसऱया पुराव्याची गरज नाही. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

पुण्यात आले असता शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, की राज्याच्या अनेक पिके वाहून गेली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. परंतु, ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सरकार बाकीच्याच गोष्टी करत आहे. केंद्र सरकारने बिहारला मदत केली, पंजाबला मदतीची भूमिका घेतली. मात्र, महाराष्ट्राच्या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये वेळकाढूपणा केला जात आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याची वाट हे सरकार बघत आहे काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राला गृहित धरण्याची चूक करू नये. अन्यथा, ते महागात पडेल.

ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज काढले आहे, त्यांचे कर्ज तात्काळ माफ करावे. तसेच ज्यांनी कर्ज न घेता खासगी सावकार किंवा इतर मार्गाने पैसा उचलला आहे, त्यांना बँक किती कर्ज देऊ शकते, तेवढी रक्कम नुकसानभरपाई स्वरूपात द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे -शिक्षण शुल्कही माफ करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न - शिंदे

पुणेः महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या हाती मदतीची रक्कम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, "आम्ही शेतीत जाऊन परिस्थिती पाहिली आहे. सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. प्रत्येक वेळी संकट आले की केंद्राने मदत केली आहे," असे त्यांनी सांगितले.

लवकरच नुकसानभरपाई देणार – मंत्री भरणे

मुंबई : सोलापूर जिल्ह्यात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर केला आहे, तर सप्टेंबरचे पंचनामे महिनाअखेरीस पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. सोलापूर जिल्ह्याकरिता सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी ३९३.७९ कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in