मराठवाड्यात अर्धे मंत्रिमंडळ बांधावर; बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ५६९ गावांना फटका; मंत्र्यांचे दौरे तरीही पंचनाम्याचे कागद कोरे!

मराठवाड्यावर अतिवृष्टीचे गंभीर संकट ओढावले आहे. तब्बल १,७४५ गावे पावसाच्या तडाख्यात सापडली असून ८६ जणांचा मृत्यू आणि १,७२५ जनावरांचा बळी गेला आहे. २३ लाख ९६ हजार हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली असून ५,२७७ घरे कोसळली आहेत. वार्षिक सरासरीपेक्षा दीडपट पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील ५६९ गावे सर्वाधिक बाधित आहेत.
मराठवाड्यात अर्धे मंत्रिमंडळ बांधावर; बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ५६९ गावांना फटका; मंत्र्यांचे दौरे तरीही पंचनाम्याचे कागद कोरे!
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे, जणू आभाळच कोसळले आहे. विभागातील तब्बल १ हजार ७४५ गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली असून, यात ८६ जणांनी जीव गमावला आहे, तर जवळपास १ हजार ७२५ जनावरे दगावली आहेत. या भयंकर संकटाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, २३ लाख ९६ हजार १६२ हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत, तसेच ५ हजार २७७ घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यासाठी वार्षिक सरासरीच्या दीडपट पाऊस झाला आहे, ज्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ५६९ गावांना फटका बसला.

या पार्श्वभूमीवर, एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि राज्याचे अख्खे मंत्रीमंडळ अतिवृष्टिग्रस्त जिल्ह्यांचे दौरे करत आहे, तर दुसरीकडे प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे.

पंचनाम्याचे काम अपूर्ण

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, आणि लातूर या जिल्ह्यांनी नुकसानीचे पंचनामेच पूर्ण केले नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच पंचनाम्याचे काम सर्वात कमी (केवळ ०.२२%) असल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जालना (२३%) आणि बीड (४२%) यांसारख्या मोठ्या नुकसानीच्या जिल्ह्यांमध्येही पंचनाम्याचे काम अपूर्ण असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. २४ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असले तरी, अद्याप ओला दुष्काळ जाहीर होत नाहीये.

रडारचा प्रकल्प अजूनही कागदावरच

मराठवाड्यात हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठीचा एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याचा महत्त्वाचा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे.

भविष्यात गावे व शेतीला अपाय होणार नाही, यासाठी तात्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी १६ कोटी रुपये आणि वाळूज एमआयडीसीतील साजापूर रस्त्याला तत्त्वतः मंजुरी दिली. तसेच, टाटा संस्थेच्या सहयोगाने ७००० विद्यार्थी शिकू शकतील, असे कौशल्य विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्याबाबत उद्योग विभाग प्रयत्नशील आहेत.

उदय सामंत, उद्योग मंत्री

झिरवाळांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश

नाशिक : पेठ तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचा अहवाल शासनास सादर करून शेतकऱ्यांसाठी योग्य तो नुकसानभरपाईचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. मंत्री झिरवाळ यांनी गुरुवारी पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव भूवन आदी गावांमध्ये जाऊन नागली, वरई, भात, उडीद, वाल यासारख्या पिकांच्या नुकसानीची थेट पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे पीक फुलोऱ्यात असताना झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे तत्परता आणि दक्षतेने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

नरहरी झिरवाळ, विशेष सहाय्य मंत्री

logo
marathi.freepressjournal.in