छत्रपती संभाजीनगर : रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या तुफान पावसामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडले.
पैठण तालुक्यासह जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यांत पावसाने कहरच केला. वडीगोद्री सर्कलमध्ये १८५. ३० मिमी, तर गोंदी येथे १०४.०० मिमी., सुखापुरी सर्कलमध्ये ७१.८० मिमी, तर घनसावंगी तालुक्यात कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी व अंतरवाली सर्कलमध्ये प्रत्येकी ११५ मिमी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्वच मोठ्या नद्यांना पूर आला आहे. जायकवाडीसह मांजरा, माजलगाव या मोठ्या जलशयांतून विसर्ग सुरू करण्यात आला असून अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाण्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रविवारी पहाटे धरणात १ लाख १३ हजार १४० क्युसेकने पाण्याची आवक झाली. धरणाचे आपत्कालीन नऊ दरवाजांसह सर्व २७ दरवाजे साडेचार फुटांनी उचलून १ लाख १३ हजार क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
१० जणांची सुटका
गोदाकाठावरील कुटुंबे नदीकाठी वास्तव्यास असताना नदीला अचानक पूर आल्याने या तिन्ही कुटुंबांतील लहान, मोठ्यांसह १० जण अडकले होते. रात्रभर ते एकाच ठिकाणी अडकले होते. सोमवारी सकाळी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वडीगोद्रीचे मंडळ अधिकारी संदीप नरूटे, तलाठी कैलास ढाकणे, विनोद कड यांनी अंबड येथून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केल्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका केली आहे.
पोलादपूर तालुक्यात मुसळधार
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभरात रविवारी संध्याकाळपर्यंत १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यासह सरासरी पावसाची नोंद ३७२९ मि.मी. झाली आहे. यामुळे परिसरात रातोरात पूरस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी जनजीवन नेहमीप्रमाणे सामान्यच राहिले. रविवारी सायंकाळी महाबळेश्वर व पोलादपूर तालुक्यात पावसाने जोर धरल्याने उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र पोलादपूर शहरातील जुन्या महाबळेश्वर येथील गणेशमंदिर घाट व राममंदिर घाटावरून रस्त्यावरून वाहू लागले.
नेरळ-माथेरान घाटात कडा कोसळला
माथेरान : मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नेरळ-माथेरान घाट परिसरात नांगरखिंड येथे कडा कोसळला. त्यामुळे घाटातील वाहतूक काही वेळ ठप्प होती. मात्र रस्त्यावरील मलबा हटवल्यानंतर सकाळी येथील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. नेरळ-माथेरान घाट परिसरात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. काही तासांत येथे २७१ मिमी पाऊस पडला. पहाटे अंदाजे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास नांगरखिंड येथे कड्याचा काही भाग कोसळल्याने घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली.