

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मान्सून लांबल्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. पावसाअभावी विभागातील ११ प्रमुख जलसिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा ३३.५९ टक्क्यांवर आला आहे, तर दोन मोठ्या धरणांमधील पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.
मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७९.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जूनमधील १२९.५ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०३.१ मिमी पाऊस पडल्याचे अधिकृत अहवालात म्हटले आहे.
दोन धरणे पूर्णपणे कोरडी
अहवालानुसार, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. धाराशिवमधील सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा उणे (-२.८७) टक्क्यांवर पोहोचला आहे, तर हिंगोलीतील सिद्धेश्वर प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. गेल्या वर्षी सिद्धेश्वर धरणात २१.३९ टक्के पाणीसाठा होता. याशिवाय बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि मांजरा प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १८.७५ टक्के आणि १९.१२ टक्के पाणी शिल्लक आहे. दरम्यान, बुधवारपासूून मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाने दमदार सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी घट
पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ११ प्रमुख सिंचन प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता १८२.०७ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. मात्र, सोमवारपर्यंत या धरणांमध्ये केवळ ३३.५९ टक्केच पाणी शिल्लक होते. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२.८५ टक्के (७८.०१ टीएमसी) इतका होता. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
प्रमुख प्रकल्पांमधील सद्यस्थिती
जायकवाडी (छत्रपती संभाजीनगर): २८.०३ टक्के,
निम्न दुधना (परभणी): २५.५० टक्के,
येलदरी (परभणी): ५१.७० टक्के,
पेनगंगा (नांदेड): ४४.९७ टक्के,
मानार (नांदेड): ४०.४९ टक्के,
निम्न तेरणा (धाराशिव): ३५.०६ टक्के,
विष्णुपुरी (नांदेड): ३६.५१ टक्के.
पाऊस लांबल्यास मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.