

छत्रपती संभाजीनगर : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल जाणवत असून अनेक भागांत ढगाळ आणि उष्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. या भागासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या असून काही भागांत दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे.
कोकण विभागात हवामानात बदल जाणवत असून उष्ण आणि दमट वातावरण आहे. कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र या विभागासाठी कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि घाटमाथ्यावरील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र बहुतांश ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण कायम आहे. पाऊस थांबल्यानंतर उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांसह शेतकरीही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
पाऊस २१ जुलैनंतर सक्रिय होणार ?
पाऊस अचानक कुठे गायब झाला? आणि तो पुन्हा कधी सक्रिय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मात्र बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे.