

छत्रपती संभाजीनगर : यंदा ‘एल-निनो’ प्रवाहामुळे देशात पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला होता. आता राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली तरीही मराठवाड्यात पाणी संकट उभे राहिले आहे.
यंदाचा मान्सून संपायला अवघे ५० दिवस शिल्लक राहिले असतानाही, मराठवाडा विभागातील लघू आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही क्षमतेच्या ४५ टक्क्यांपेक्षा कमीच आहे, अशी माहिती एका अधिकृत अहवालातून समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निम-शुष्क प्रदेशात विविध नद्यांवर ७६ मध्यम आणि ७७८ लघू सिंचन प्रकल्प बांधले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, या ७६ मध्यम प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ९५८.४ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, ७ ऑगस्टपर्यंत या प्रकल्पांमध्ये २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होता, जो एकूण क्षमतेच्या अवघा २१.६० टक्के आहे.
तसेच, संपूर्ण विभागातील ७७८ लघू प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १६९१.५ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या २९५.९ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या १७.५० टक्के आहे.
गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांची क्षमता ३४८.२ दशलक्ष घनमीटर असून, त्यात सध्या ४५.६६ टक्के (१५८.९ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा आहे, असे अहवालात नमूद केले.
लातूर, धाराशिव आणि बीडच्या काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा आणि मांजरा नद्यांवरील ३५ बंधाऱ्याची स्थिती बिकट आहे. या बंधाऱ्यात सध्या ६.३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, तो एकूण क्षमतेच्या (७७.५ दशलक्ष घनमीटर) ८.३ टक्के आहे.
मराठवाड्यात ३५२.९ मिमी पावसाची नोंद
दुसऱ्या एका अहवालानुसार, या भागात १ जूनपासून ३५२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे अपेक्षीत पावसाच्या (३८२.६ मिमी) ९२.२ टक्के आहे. परभणी (७६.७ टक्के) आणि लातूर (६७.७ टक्के) या जिल्ह्यांमध्ये पाऊस तुलनेने कमी झाला आहे. फक्त छत्रपती संभाजीनगर (११३.४ टक्के) आणि जालना (१०९.५ टक्के) या दोनच जिल्ह्यांमध्ये अपेक्षीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.