कोल्हापूर रस्त्यांसाठी मार्च उजाडणार; खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न, ड्रेनेज, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई-बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली.
कोल्हापूर रस्त्यांसाठी मार्च उजाडणार; खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
Published on

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न, ड्रेनेज, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई-बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून करण्यात येणारे रस्ते मार्चपर्यंत पूर्ण होतील, पाण्याच्या १२ पैकी ११ टाक्या बांधण्यात आल्या असून, क्रॉस कनेक्शन जोडून लवकरच संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होईल, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. केएमटी ई-बससाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारून लवकरच या बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

केंद्र शासनाकडून शंभर ई -बसेस मंजूर आहेत. चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाची कामे पुर्ण झाल्यानंतर, या बसेस केएमटीच्या ताफ्यात येणार आहेत. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दिल्लीत ५०० ई-बसेस पडून आहेत. त्या लवकर कोल्हापुरात दाखल व्हाव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा गतीने निर्माण कराव्यात, असे आदेश खासदार महाडिक यांनी दिले. शिवाजी विद्यापीठाच्या हद्दीतून जाणाऱ्या डीपी रस्त्याचे काम २०१६ सालापासून प्रलंबित आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात आली हे गृहीत धरून, महापालिकेने बांधकाम परवानगी दिली असल्याचे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करून, तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा. त्यानंतर तो ८ दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडे गेला पाहीजे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. शंभर कोटी अनुदानातून मंजूर रस्ते कधी पूर्ण होणार, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. मार्च अखेरपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील, असे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले. हे रस्ते दर्जेदार आणि चांगले झाले पाहीजेत, अशी सूचनाही खासदार महाडिक यांनी केली.

पाणीपुरवठ्याचा घोळही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी येत नाही, अशी तक्रार प्रा. जयंत पाटील यांनी केली. तर वारंवार पाणीपुरवठा खंडित का होतो, अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. याबाबत जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी खुलासा केला. कोल्हापुरात शहरात बारा टाक्यांपैकी नवीन अकरा टाक्यांचे काम पूर्ण आहे. पाच टाक्यांची चाचणी झाली आहे. त्यापैकी तीन टाक्या लवकरच सुरू होतील, असे जलअभियंत्यांनी सांगितले. अमृत १ योजनेतून ड्रेनेज आणि शहरात तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

अमृत २ मधून उपनगरात २४३ किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. जुनी ड्रेनेज योजना कालबाह्य झाल्याने, ती बदलणे गरजेचे असल्याचे आर.के.पाटील यांनी सांगितले. त्यावर ड्रेनेज बाबतचा सविस्तर प्रस्ताव द्यावा. निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करू, असे खासदार महाडिक यांनी नमुद केले.

सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची माहिती त्यांनी घेतली. ११५ बेडच्या इमारत बांधकामासाठी ४५ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. दरम्यान या ठिकाणी जादा बेडचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. आरोग्य, बांधकाम विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यासाठी ठोक मानधनावर भरती करता येईल का, अशी विचारणा प्रा. जयंत पाटील यांनी केली. जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा परिषदेला शाळा आणि दवाखान्यांसाठी निधी मिळतो. तसाच निधी महापालिकेलाही मिळावा, अशी अपेक्षा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली. निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिले. शहरातील अतिक्रमण वाढत आहेत, महाद्वार, ताराबाई रोड, जोतिबा रोड या ठिकाणी परप्रांतीय फेरिवाल्यांनी ठिय्या मांडलाय. ही अतिक्रमणे दूर करावीत, अशी मागणी अजित ठाणेकर यांनी केली. कोल्हापूर शहरातील मैदाने विकसित करण्याबरोबर छोटया छोटया जागा विकसित कराव्यात. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठवावा, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. तलाव संवर्धनाबाबतही चर्चा झाली.

कोटी तिर्थ तलावाच्या विकासासाठीचा प्रस्ताव द्यावा. कोल्हापूर शहरात वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा लागेल. कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल पासून शिवाजी पुलापर्यंत तसेच त्याला जोडणारे ७ उड्डाण पूल उभारण्यासाठी आमदार महाडिक यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत प्रयत्न केले आहेत.

स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होतील. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार प्रभाग असतील, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर शहराची हद्दवाढीत ज्या गावांचा समावेश होणार आहे, त्या गावांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

आगे आगे देखो होता है क्या

महायुतीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली जाईल अशी ग्वाही देतानाच, अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आगे आगे देखो होता है क्या, अशा शब्दात त्यांनी नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. राजकारणात टिका ही होतच असते. मात्र काविळ झाल्यामुळे सगळे जग पिवळे दिसते, अशी स्थिती विरोधकांची झाल्याचा टोलाही महाडिक यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in