अनिल पवार/ नागोठणे
बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने रोहा तालुक्यातील रोहा शहर, चणेरा, कोलाड तसेच नागोठणे शहरातील बाजारपेठ फुलून निघाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकीकडे आपल्या भाऊरायाच्या पसंतीस उतरेल, अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती, तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवावर्ग व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त रोहा तालुक्यातील विविध बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहीण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन सोमवारी साजरा होणार आहे. मात्र यंदा महागाईमुळे दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
रोहा, कोलाड, नागोठणे येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपारिक गोंडा राख्यांसह विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. कमीतकमी पाच ते दहा रुपयांपासून अगदी ५० ते ६० रुपये आणि त्याहूनही अधिक किमतीच्या विविध प्रकारच्या राख्या रक्षाबंधननिमित्त बाजारपेठेत उपलब्ध आहेत. महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने रोहा आणि नागोठणे शहराच्या विविध भागांमध्ये लहान-मोठी राखीची दुकाने सजल्याचे दिसत आहे. बाहेरगावी तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरायांना पोस्टाने वेळेत राखी पोहोचण्यासाठी आधीपासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. जेणेकरून चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे. दुसरीकडे व्यावसायिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे ५० टक्क्याने ग्राहक वाढले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली.
यंदा राख्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी राख्यांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. मात्र तरीही राखी खरेदीसाठी महिलावर्ग दुकानात गर्दी करत आहेत. त्यामुळे यावर्षीही बाजारपेठेत सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.
- सतिश पाटील, व्यावसायिक नागोठणे - रोहा
कुंदन वर्क, साध्या राख्यांना मागणी
चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपरिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस
आल्या आहेत. दरम्यान, राख्यांमधील नावीन्यता म्हणजे गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी बाजारात आल्या आहेत. स्पिनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लायटिंग राखीची आकर्षकता वाढवते.