विवाहित मुलींना पित्याच्या घरी राहण्याचा हक्क; उच्च न्यायालयाचा निकाल

हिंदू कायद्यानुसार विवाहित मुलींनाही वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
Mumbai High Court
Mumbai High Court
Published on

मुंबई : हिंदू कायद्यानुसार विवाहित मुलींनाही वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी हा निर्वाळा देत सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालय आणि जिल्हा अपीलीय न्यायालयाचे तीन बहिणींना दिवंगत वडिलांची मालमत्ता सोडण्यास सांगणारे आदेश रद्द केले. वडील १९५६ पूर्वी किंवा नंतर मरण पावले असले तरी मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर हक्क आहे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने वडिलांच्या मालमत्तेवरील हक्क धुडकावल्यानंतर तीन बहिणींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अपिलावर न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि अपीलकर्त्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला. अपिलकर्त्या बहिणींचे वडील राम हे १९५६ पूर्वी किंवा नंतर मरण पावले असले तरी अपीलकर्त्या महिला-मुली असल्याने त्यांचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क संरक्षित आहे. हिंदू कायद्याने त्यांना हा हक्क आहे. १९५६ पूर्वी राम किंवा त्याच्या मालमत्तेचा वारसा मिळालेल्या वारसांना संबंधित मालमत्तेतून देखभाल करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणातील संबंधित जमीन मूळची नाथा नावाच्या व्यक्तीची होती. त्याला राम आणि चंदर ही दोन मुले होती. कौटुंबिक विभाजनात ती जमीन रामाला मिळाली होती.

logo
marathi.freepressjournal.in