म्हैसाळमधील सामूहिक आत्महत्या, नव्हे हत्याकांड ; पोलीस तपासात निष्पन्न

जेवणातून विषारी औषध देऊन मारल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे
म्हैसाळमधील सामूहिक आत्महत्या, नव्हे हत्याकांड ; पोलीस तपासात निष्पन्न

म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केली नसून हे सामूहिक हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केली नसून, त्यांना जेवणातून विषारी औषध देऊन मारल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणी दोघा मांत्रिकांना पोलिसांनी सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे.

म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिकानगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहत होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक, तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. यापैकी एका घरात सहा मृतदेह आढळून आले होते. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आदित्य माणिक वनमोरे, अनिता माणिक वनमोरे आणि अक्काताई वनमोरे या नऊ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण २० जून रोजी समोर आले होते; पण एकूणच हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांनी गेले सात ते आठ दिवस कसून तपास केला. अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येच्या ३०२ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अब्बास महंमद बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे या दोन आरोपींनी वनमोरे कुटुंबातील नऊ जणांची जेवणात विषारी पदार्थ मिसळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. बाकी गोष्टी तपासात निष्पन्न होतील. अजूनही चौकशी सुरू आहे, अशी माहिती सांगली पोलीस अधीक्षक प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

गुप्तधन मिळवून देण्यातून हत्याकांड

वनमोरे यांच्या शेतात गुप्तधन असून ते मिळवून देण्याचे अब्बास महंमद बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे या दोन मांत्रिकांनी दाखवले होते. त्यासाठी त्यांनी वनमोरे कुटुंबाकडून काही रक्कम घेतली होती. आणखी रकमेची त्यांनी मागणी केली होती; मात्र ती देण्यास वनमोरे कुटुंबीयांनी टाळाटाळ केल्याने बागवान आणि सरवशे यांनी हे अमानुष हत्याकांड घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in