भीषण स्फोटामुळे डोंबिवली हादरली...६ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी

डोंबिवली एमआयडीसी फेज २ सागाव भागामध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत आज दुपारी १:३०च्या सुमारास मोठा स्फोट झाला.
डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट
डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट

मुंबई: डोंबिवली एमआयडीसी फेज २ सागाव भागामध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत आज दुपारी १:३०च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटात ६ कामगारांचा मृत्यू झाला असून जवळपास ४८ कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळं कंपनीत मोठी आग लागली. त्यानंतरही बराच वेळ कमी तीव्रतेचे स्फोट होत होते. या आगीमुळं अमुदान कंपनीच्या आजुबाजूच्या कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. आगीमुळं परिसरात घबराटीचे वातावरण पसरलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

६ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी-

आज डोंबिवली पुन्हा एकदा स्फोटानं हादरली. डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जखमींवर डोंबिवलीतील नेपच्यून, एम्स इत्यादी हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत.

रेस्क्यू ऑपरेशन सुरु: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, "डोंबिवली स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आता रेस्क्यू ऑपरेशन आहे. स्वतः खासदार, जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम तिथं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे."

शेजारच्या कंपन्यांचंही नुकसान-

डोंबिवली एमआयडीसीतील आग दुर्घटनेमुळं अमुदान कंपनीच्या शेजारच्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा ठेवला होता. त्याचं योग्य प्रकारे निरीक्षण होत नव्हतं, असा आरोप शेजारील कंपनीचे मालक डॉ.शेवडे यांनी केला.

जेवण सुरु होतं अन् अचानक आला स्फोटाचा आवाज...

या परिसरातील गणेश भुवन या हॉटेलचे मालक योगेश भट यांनी सांगितलं की, "20 ते 25 ग्राहक इथं जेवण करत होते आणि ८ कर्मचारी त्यांना सेवा देत होते. दरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. आम्हाला वाटलं की भूकंप झालाय, म्हणून आम्ही ग्राहकांना तातडीनं हॉटेलमधून बाहेर पडायला सांगितलं. या धावपळीत दोन ग्राहक किरकोळ जखमी झाले."

logo
marathi.freepressjournal.in