पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटात धामणदिवी-चोळई गावाजवळ मंगळवारी रात्री प्रचंड दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद झाली. सुमारे १४ तासांनंतर बुधवारी दुपारी दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, मुसळधार पावसामुळे बचावकार्याला काही काळ अडथळा निर्माण झाला.
मंगळवारी अन्नपूर्णासमोरील डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण मुंबई लेन माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेला. दरडप्रवण क्षेत्रात सतत दगड कोसळत असल्याने कशेडी टॅप वाहतूक पोलीस व पोलादपूर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवत गोव्याकडे जाणारी लेन दुहेरी करून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू ठेवली.
तहसीलदार कपिल घोरपडे, प्रांताधिकारी डॉ. पोपट ओमासे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या.