
अलिबाग : अलिबागमधील एका खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
सुचिता सुशील थळे या गर्भवती महिलेला सोमवारी बाळंतपणासाठी अलिबामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुचिताचे सीझर करण्यात आले. तिने मुलाला जन्म दिला, रात्री सुचिताच्या छातीत जळजळ होऊ लागल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली, मात्र डॉक्टर आले नाही. मंगळवारी सकाळी सुचिताची तब्येत जास्तच बिघडल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यानंतर सुचिताला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र जिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच सुचिताचा मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईकांमध्ये नाराजी पसरल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी डॉक्टर व परिचारिकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली.