

माथेरान : माथेरानमध्ये पर्यावरणपूरक रस्त्यांच्या कामासाठी ‘क्ले पेव्हर ब्लॉक’चा वापर योग्य असल्याचा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (NEERI) ने सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्थेच्या अभ्यासासही नीरीने मान्यता दिली आहे. या अहवालामुळे सध्या अर्धवट राहिलेले अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी माथेरानमध्ये क्ले पेव्हर ब्लॉक्स वापरण्याच्या कामावर स्थानिक घोडेवाले संघटनांनी आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, हे रस्ते घोड्यांच्या चालण्यास अपायकारक आहेत व पर्यावरणालाही धोका निर्माण करतात. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने नीरीकडून तांत्रिक अहवाल मागवला होता. त्यानुसार, क्ले पेव्हर ब्लॉक्स मातीची धूप रोखतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरू देतात आणि रस्ते नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत राहतात, असे नमूद करण्यात आले आहे. सध्या माथेरानमध्ये अनेक रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय व घसरडे होतात, त्यामुळे नागरिकांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. क्ले पेव्हरला मंजुरी मिळाल्यास हे काम पुन्हा सुरू होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित असून, तो माथेरानच्या विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी निर्णायक ठरणार आहे.