

माथेरान : माथेरान नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला मिळालेल्या यशानंतर शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या घोडा व ई-रिक्षा संघटनांमधील वादामुळे प्रशासनाचा मोठा वेळ त्याच प्रश्नात खर्च होत असून, विकासकामे रखडल्याची खंत नगरसेविकांनी व्यक्त केली आहे.
महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे माथेरानमधील नगरसेवक, नगरसेविका आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेविका रिजवाना शेख, ऐश्वर्या शिंदे, लता ढेबे, सुरेखा साळुंखे, कमल गायकवाड, अर्चना भिलारे तसेच महिला आघाडीच्या प्रमुख संगीता जांभळे यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रभागांतील रस्ते व इतर महत्त्वाची कामे प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार क्ले ब्लॉक्सच्या रस्त्यांचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेषतः महात्मा गांधी रस्त्यापासून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, कस्तुरबा रोडवरील निकृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिक जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. याच मार्गावरून ई-रिक्षांची वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
नगरपालिकेकडून तुटलेले क्ले ब्लॉक्स बदलण्याचे काम सुरू असताना काही घोडेधारकांकडून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप नगरसेविकांनी केला. २०१४ मध्ये मातीची धूप रोखण्यासाठी आणि धूळमुक्त रस्ते करण्यासाठी क्ले ब्लॉक्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.