

चंद्रकांत सुतार/ माथेरान
यावर्षी थर्टी फर्स्ट बुधवार या कामकाजाच्या मधल्या दिवशी आल्याने, त्यातच एकादशी असल्यामुळे कोणतीही सलग सुट्टी न मिळाल्याने निसर्गरम्य माथेरानमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र पहावयास मिळाले. थंडगार व आल्हाददायक वातावरण असूनही अपेक्षित पर्यटक न आल्याने व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
थर्टी फर्स्ट हा दिवस उत्साह, गर्दी आणि व्यवसाय वाढवणारा मानला जातो. मात्र यंदा हा दिवस कामकाजाच्या मधोमध आल्याने अनेक पर्यटकांनी बाहेरगावी जाणे टाळले. विशेष म्हणजे बदलापूर, शेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या फॉर्महाऊसकडे पर्यटकांचा कल वाढल्याचे चित्र दिसून आले. सर्व सुखसोयी असलेली आकर्षक पॅकेजेस, तसेच अनेक ठिकाणी नियमांची सक्ती नसल्यामुळे पर्यटकांनी माथेरानपेक्षा फॉर्महाऊसना प्राधान्य दिल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक, लॉज चालक, घोडेवाले, हातगाडीवाले, दुकानदार व छोटे व्यावसायिक सलग सुट्ट्या आणि पीक सीझनकडे मोठ्या आशेने पाहत असतात. मात्र यंदा थर्टी फर्स्ट बुधवारी आल्याने ही अपेक्षा फोल ठरली. बुधवार हा खास खवय्यांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जात असला, तरी कामकाजाचा दिवस असल्याने पर्यटकांची पावले माथेरानकडे वळली नाहीत.
नाताळ सीझनमध्ये २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत सलग व्यवसाय होतो. मात्र यंदा थर्टी फर्स्ट कामकाजाच्या दिवशी आल्याने पर्यटक आले नाहीत. त्यामुळे साठवलेला माल पडून राहिला असून पुढील दिवसांतही सीझन मंद राहण्याची शक्यता असल्याने मोठ्या नुकसानीची भीती आहे.
रवींद्र कदम, स्थानिक दुकानदार
नेहमीची गर्दी पूर्णपणे गायब
आज माथेरानमधील रस्ते, बाजारपेठा आणि पर्यटनस्थळे ओस पडलेली दिसत असून नेहमीची गर्दी पूर्णपणे गायब झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी या कालावधीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी व मालसाठा केला होता. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात शांततेचे वातावरण असून नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. एकूणच, यंदाचा थर्टी फर्स्ट माथेरानसाठी आनंदाचा न ठरता गारठवणारा ठरला असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या या शहराला सलग सुट्ट्या आणि योग्य पर्यटन नियोजनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.