माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा

थंड हवेचे ठिकाण म्हणून देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासोबतच सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे.
माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा
माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा
Published on

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासोबतच सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र या वाढत्या गर्दीच्या तुलनेत माथेरानची वाहतूक व्यवस्था अत्यंत अपुरी ठरत असल्याने पर्यटकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. माथेरानला येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी असलेल्या मर्यादित वाहतूक व्यवस्थेमुळे अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी पर्यटकांना तब्बल पाच ते सहा तास टॅक्सीच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र सुट्टीच्या दिवशी पाहायला मिळाले. पर्यटकांची संख्या वाढत असताना टॅक्सी सेवा कमी पडणे, रांगा वाढणे आणि वाहतूक नियंत्रणावर ताण येणे यामुळे संपूर्ण व्यवस्था अक्षरशः कोलमडल्याचे दिसून आले.

माथेरानसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळासाठी ही परिस्थिती निश्चितच गंभीर आहे. पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात; मात्र माथेरानमध्ये पोहोचण्यापूर्वीच जर त्यांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असेल, तर या अनुभवाचा थेट परिणाम माथेरानच्या पर्यटन प्रतिमेवर होणार आहे. पर्यटन वाढावे, स्थानिकांना रोजगार मिळावा आणि व्यवसायाला चालना मिळावी अशी अपेक्षा असताना पर्यटकांना प्रवासातच त्रास सहन करावा लागणे हे प्रशासनाच्या वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

रोपवे असो, फ्युनिक्युलर रेल्वे

पर्यायी मार्ग म्हणजे माथेरानच्या डोंगरावर मोठा डांबरी रस्ता करण्याचीच गरज आहे असे नाही. पर्यावरणपूरक रोपवे असो, फ्युनिक्युलर रेल्वे असो, आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र संपर्कमार्ग असो किंवा पर्यावरणाच्या नियमांचे पालन करून अन्य कोणतीही शाश्वत वाहतूक व्यवस्था असो; पर्याय कोणताही असो, माथेरानला पर्यायी संपर्क व्यवस्था आवश्यक आहे.

(Photo - Instagram)

...तर बाहेरील जगाशी संपर्क पुन्हा तुटू शकतो

२६ जुलै २००५ च्या महाप्रलयाची आठवण आजही माथेरानकरांच्या मनात ताजी आहे. अतिवृष्टीच्या काळात रस्ते, दरडी आणि डोंगर उतारांवरील माती यामुळे माथेरानचा संपर्क मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला होता. काही ठिकाणी डोंगराचा भाग कोसळून रस्त्यावर मातीचे ढिगारे आले होते. अशा परिस्थितीत मुख्य संपर्कमार्ग बंद झाला तर माथेरानचा बाहेरील जगाशी संपर्क पुन्हा तुटू शकतो. त्यामुळे पर्यायी मार्ग हा आता केवळ पर्यटन सुविधेचा विषय राहिलेला नसून आपत्ती व्यवस्थापन आणि माथेरानच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.

...तर पर्यटक दुसऱ्या पर्यटनस्थळाकडे वळतील

आज पावसाळी पर्यटन आणि सलग सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उद्या ही संख्या आणखी वाढणार आहे. मात्र पर्यटकांची संख्या वाढत असताना त्यांना वाहतूक सुविधा देण्याची क्षमता वाढली नाही, तर गर्दीचे रूपांतर माथेरानच्या पर्यटनासाठी मोठ्या समस्येत होऊ शकते. पर्यटक एकदा-दोनदा त्रास सहन करतील; परंतु वारंवार तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागले, प्रवासासाठी मोठा वेळ खर्च झाला आणि वाहतूक व्यवस्था अपुरी ठरली तर पर्यटक दुसऱ्या पर्यटनस्थळाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी वाहतूक व्यवस्था नसलेली ही गर्दी उद्या माथेरानच्या पर्यटनासाठी शाप ठरू शकते.

आजही पर्यायी मार्ग नाही

सर्वात गंभीर बाब म्हणजे माथेरानसाठी आजही सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. वर्षानुवर्षे पर्यायी मार्गाची चर्चा होत आहे. रोपवे प्रकल्प, फ्युनिक्युलर प्रकल्प, तसेच धोधानी मार्गे पर्यायी रस्त्याच्या चर्चेला अनेक वर्षे झाली. १९७१ मध्ये भूमिपूजन झालेल्या धोधानी मार्गाचे पुढे काय झाले, हा प्रश्नही आज पुन्हा उपस्थित होत आहे. एखादा पर्यायी मार्ग उभारण्याचा प्रयत्न झाला, प्रस्ताव झाले, चर्चा झाल्या; मात्र प्रत्यक्षात माथेरानला संकटाच्या वेळी आधार देईल अशी पर्यायी संपर्क व्यवस्था निर्माण झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्वसाधारण वाहन वाहतुकीवर निर्बंध असून रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहनांना अपवाद आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in