निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, हिरवाईनं नटलेलं आणि धुक्याच्या शुभ्र चादरीत हरवून जाणारं माथेरान १७६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते
निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते
Published on

माथेरान : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, हिरवाईनं नटलेलं आणि धुक्याच्या शुभ्र चादरीत हरवून जाणारं माथेरान १७६ वा वाढदिवस साजरा करत आहे. महाराष्ट्राचे एकमेव वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेलं माथेरान हे केवळ डोंगररांगांमधील सुंदर गाव नाही, तर इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि मानवी जिद्दीचं प्रतीक आहे.

इ. स.१८५० मध्ये ठाण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी ह्यू पॉईंट्झ मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला आणि त्यानंतर ब्रिटिशांनी येथील थंड हवामान, हिरवाई आणि शांत वातावरण पाहून या ठिकाणाचा हिल स्टेशन म्हणून विकास सुरू केला. ‘माथेरान’ म्हणजे ‘माथ्यावरचं जंगल’ असा अर्थ असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर उंचीवर वसलेलं हे ठिकाण आजही निसर्गसंपन्नतेमुळे पर्यटकांना आकर्षित करतं. माथेरानच्या चारही बाजूंना दऱ्या, घनदाट जंगल आणि लाल मातीचा प्रदेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. धुक्याचे पडदे, ओढे, झरे आणि विविध जैवविविधतेमुळे माथेरान हे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र मानलं जातं. येथील दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि प्राण्यांमुळे माथेरान केवळ पर्यटनस्थळ नसून पर्यावरण संवर्धनाचं जिवंत उदाहरण ठरतं. माथेरानची खरी ओळख म्हणजे येथील वाहनबंदी. पूर्वीपासून येथे घोडे आणि हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा हेच प्रमुख प्रवासाचे साधन होते.

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते
माथेरानमध्ये Use & Throw रेनकोटवर बंदी; प्लास्टिकमुक्त पर्यटनासाठी ठोस पावले

काळ बदलला तसे आधुनिकतेची चाहूल लागली आणि आता ई-रिक्षांचा पर्याय पुढे येत आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता प्रवास अधिक सोयीस्कर करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी विकास करताना माथेरानची मूळ ओळख जपणं तितकंच आवश्यक आहे.

ब्रिटिश काळात श्रीमंत अधिकारी आणि व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं माथेरान आता सर्वसामान्य पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ बनलं आहे. चार्लोट लेक, पॅनोरमा पॉईंट, इको पॉईंट, लुईसा पॉईंट, वन ट्री हिल यांसारखी ठिकाणं आजही पर्यटकांना भुरळ घालतात. माथेरानची मिनी ट्रेन ही येथील ऐतिहासिक ओळख असून डोंगर-दऱ्यांतून धावणारी ही ट्रेन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. पर्यटनामुळे येथील हॉटेल व्यवसाय, घोडेवाले, हातरिक्षाचालक, दुकानदार, फोटोग्राफर आणि छोटे व्यावसायिक यांना रोजगार मिळतो.

माथेरानमध्ये पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असून अनेक कुटुंबं पिढ्यानपिढ्या पर्यटकांवर आधारित व्यवसाय करत आहेत. येथील लोक साधे, प्रेमळ आणि मेहनती आहेत. पर्यटकांना मदत करणं आणि पाहुणचार करणं ही माथेरानची परंपरा आहे. डोंगराळ भाग असूनही माथेरानमध्ये शिक्षणाची चांगली परंपरा आहे. स्थानिक युवकांना रोजगार, घोडेवाले आणि हातरिक्षाचालकांना सुविधा, उत्तम आरोग्य व शिक्षण व्यवस्था आणि ऐतिहासिक वारसा जपत विकास होणं आवश्यक आहे.

प्लास्टिकमुक्त माथेरानची अपेक्षा

माथेरानमध्ये प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि पर्यावरणीय ताणही वाढू लागला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले भविष्यातील माथेरान हे पूर्णपणे स्वच्छ, प्लास्टिकमुक्त, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पर्यटनस्थळ असावं, अशी प्रत्येक माथेरानकराची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in