
रामभाऊ जगताप/कराड
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फलटण नगरीत शनिवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. १०० एकराच्या विमानतळ मैदानावर विसावलेल्या या भव्य सोहळ्यात लाखो वैष्णवांनी सहभाग घेतला. पहाटे टाळ, मृदंग आणि भूपाळीच्या गजरात सोहळा सुरू झाला.
संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते माऊलींची पूजा आणि आरती झाल्यानंतर पालखी तरडगावहून मार्गस्थ झाली. दत्त मंदिर, काळज येथे अर्ध्या तासाची विश्रांती घेतल्यानंतर सोहळा सुरवडीकडे गेला. उड्डाण पुलावरील अपूर्ण डांबरीकरण आणि ट्रक बंद पडल्यामुळे दोन तास वाहतूक खोळंबली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मार्ग मोकळा झाला.
सकाळी सुरवडी येथे न्याहारीनंतर पालखी निंभोरे ओढा येथे पोहोचली.उकाड्यामुळे वारकऱ्यांची परीक्षा होत असली, तरीही त्यांचा उत्साह अविरत होता. सायंकाळी वडजल विश्रांतीनंतर पालखी फलटण नगरपालिकेच्या हद्दीत जिंती नाका येथे दाखल झाली. नगर परिषद प्रशासक निखिल मोरे व अधिकाऱ्यांनी तिचे स्वागत केले. त्यानंतर पालखी मलठण, उंबरेश्वर चौक, संत हरीबाबा मंदिर, तीन बत्ती चौक मार्गे कसबा पेठेत पोहोचली. येथे बालशिवाजी गणेशोत्सव मंडळाने पुष्पवृष्टी केली. श्रीराम मंदिर येथे नाईक-निंबाळकर कुटुंबियांनी पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले. विमानतळ मैदानावर माऊलींसाठी भव्य शामियानाउभारण्यात आला होता.
वाहतूक नियोजनात त्रुटी
सुरवडी ते काळजदरम्यान उड्डाण पुलाचे केवळ ५० मीटर डांबरीकरण न झाल्याने पुल बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय सर्व्हिस रस्त्यावर कमिन्स कंपनीचा मालवाहू ट्रक बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि व्यवस्थापक माऊली वीर यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. सातारा पोलीस प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी यावेळी ठळकपणे समोर आल्या.
नाईक-निंबाळकरांचे स्वागत
श्रीराम मंदिर येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे, विश्वजितराजे, रविराज नाईक निंबाळकर (कोल्हापूर), किशोरसिंह नाईक निबाळकर, डॉ. राजवैद्य अॅड. अभिजीत मोहिते आणि ट्रस्टच्या मानकऱ्यांनी माऊलींचे औक्षण, पूजा व स्वागत केले. ग्रामस्थांनी दर्शन घेतले.
मानकरींचा सन्मान
नगरपालिकेच्या वतीने संस्थान प्रमुख योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी तुकाराम, आणि विविध मानकऱ्यांचा फेटा व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
पुण्यात पहिले गोल रिंगण
पुणे : टाळ-मृदंगाचा नाद आणि ज्ञानोबा-तुकोबा नामाचा गजर... अशा वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. त्यानंतर पालखी निमगाव केतकी मुक्कामी दाखल झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा शुक्रवारी सणसरमध्ये मुक्काम होता. सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाला, सणसरकरांनी पालखीला जड अंतःकरणाने निरोप दिला. पंढरीच्या मार्गावर पालखी येताच वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. टाळ घणघणले, मृदंगाचा नाद जडू लागला. त्याला सोबत लाभली, ती तुकोबारायांच्या अभंगांची. या अभंगांमधून विठ्ठलभक्तीचा नाद घुमला.