मुंबई : लोकसभेला राज्यात महाविकास आघाडी सरस ठरल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी विधानसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यातच ‘लोकपोल’ने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत १४१ ते १५४ जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. महायुतीचा रथ ११५ ते १२८ जागांवर राहणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणानंतर सत्ताधारी शिंदे-भाजप-अजितदादा सरकारचे टेन्शन वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच आता जनमताचा कौल घेण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्षांनी काही एजन्सीमार्फत तसेच आपल्या यंत्रणांमार्फत २८८ मतदारसंघांतील लोकांचा कल जाणून घेतला आहे. त्यातच आता राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणाऱ्या ‘लोकपोल’ने आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार असल्याचा दावा केला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीला पराभूत करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांनी जाहीर केलेल्या सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. याउलट विद्यमान सत्ताधारी महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील, असे म्हटले आहे.
‘लोकपोल’च्या ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, “आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळू शकतात तसेच त्यांची मतांची टक्केवारी ३८ ते ४१ इतकी राहू शकते. तसेच विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत म्हणजे १४१ ते १५४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी ४१ ते ४४ टक्के राहण्याची शक्यता आहे. राज्यात अपक्ष व अन्य पक्षांना ५ ते १८ जागा तसेच १५ ते १८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.” महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा जागा अजून कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी १५४ जागांचा आकडा पार करावा लागणार आहे. लोकपोलने महाराष्ट्रातील विभागनिहाय आकडेवारीही जाहीर केली आहे. विदर्भात विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागा असून महायुतीला केवळ १५ ते २० जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडी ४० ते ४५ जागांपर्यंत मुसंडी मारू शकते. अन्य पक्षांच्या खात्यात १ ते ५ जागा जाण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रात (खान्देश) विधानसभेच्या ४७ जागा असून दोन्ही आघाड्यांना समसमान जागा म्हणजेच महायुतीला व महाआघाडीला २० ते २५ जागा मिळण्याची आशा आहे. या ठिकाणी इतर पक्ष १ ते २ जागांवर निवडून येऊ शकतात. येथेही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागू शकतो. ठाणे-कोकण विभागात महाविकास आघाडीला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. नेतृत्वाचा अभाव असल्याने तसेच फक्त उद्धव ठाकरे यांचीच जादू चालणार असल्यामुळे ३९ जागांपैकी २५ ते ३० जागा सत्ताधारी महायुतीला, तर ५ ते १० जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात, तर १ ते ३ आमदार अपक्षांचे निवडून येऊ शकतात.
मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचीच जादू चालणार असे या सर्वेक्षणातून दिसत आहे. सत्ताधारी महायुतीला मात्र मुंबईत फटका बसू शकतो. त्यांना केवळ १० ते १५ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला २० ते २५ जागा मिळू शकतात. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे मुंबईतील सर्व मराठी मते जाण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला मुस्लिम वोट बँकेचा फायदा मिळेल.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये ५८ जागा असून येथे महाविकास आघाडी मुसंडी मारू शकते. येथे त्यांना ३० ते ३५, तर महायुतीला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. १ ते ५ जागा इतर पक्षांना मिळतील, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. मराठवाडा विभागात शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला बसणार आहे. या भागातील ४६ जागांपैकी महायुतीला १५ ते २० जागा, तर महाविकास आघाडीला २५ ते ३० जागा मिळू शकतात. अपक्ष ० ते २ जागांवर निवडून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा जनादेश सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारची लाडकी बहीण योजना सरकारला इतकी फायद्याची ठरत नसल्याचे दिसून येत आहे. ‘लोकपोल’ने या निष्कर्षांसोबतच हा सर्व्हे नेमका कसा केला, याची माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून ५०० मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला होता. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रे निवडण्यात आली. २० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.
काँग्रेस ठरणार ‘नंबर वन’
महायुतीला मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात चांगल्या जागा मिळू शकतात. मात्र राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनून समोर येऊ शकतो, पण त्यासाठी त्यांना जोरदार प्रचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली असून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता घटली आहे, असेही या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.
१७५ जागा मिळतील - जयंत पाटील
राज्यात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणूक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला १५५ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. मात्र या जागा वाढून १७५ पर्यंत जागा आम्हाला मिळतील, तर अजित पवार हे बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.