मविआ व महायुती हे कुणाचेच होऊ शकत नाही - जरांगे

मराठ्यांनो गाफील राहू नका, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी दिला.
मविआ व महायुती हे कुणाचेच होऊ शकत नाही - जरांगे
Published on

बीड : महाविकास आघाडीवाले सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत, म्हणून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही का? खरे तर आरक्षण देण्याची सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही. मला तर संशय यायला लागला आहे की, हे दोन्ही (मविआ व महायुती) एकच आहेत. मी मारतो, तू रडल्यासारखे कर अशी या दोघांचीही रणनीती आहे. ​​​​​​हे कुणाचेच होऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांनो गाफील राहू नका, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी दिला.

सरकारने जर फसवले, तर पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी बीडमधील शांतता रॅलीत केले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच मविआ व महायुतीच्या नेत्यांवरही हल्लाबोल केला. जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे जालना रोड ७ तास ठप्प होता.

मनोज जरांगे म्हणाले की, आमचे हक्काचे आरक्षण द्या, या ठिकाणी जमलेली गर्दी ही स्वतःच्या मुलाच्या न्याय्यहक्कासाठी आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, छगन भुजबळांच्या माध्यमातून सगळे ओबीसी नेते एक करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व सरकारच्या पाठिंब्याने सुरू आहे. भुजबळांच्या दहा पिढ्या आल्या तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मराठ्यांची चेष्टा करू नका!

शिंदे, फडणवीस यांना मी सांगतो की, मराठ्यांची चेष्टा घेऊ नका. मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या. आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा युवकाच्या घरात जाऊन बघा, त्यांच्या घरात केवळ काळोख दिसेल. बापाने आणि पोरानेदेखील आरक्षणासाठी आत्महत्या केली. जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकरांच्या डोळ्यातील अश्रू पुसा, मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in