मविआचे जागावाटप २६ फेब्रुवारीला

महायुतीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. सोबतच विरोधी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडेही अडले आहे.
मविआचे जागावाटप २६ फेब्रुवारीला

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठीचे महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत अंतिम होणार आहे. जागावाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतला महाराष्ट्रातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल. त्यासंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

महायुतीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. सोबतच विरोधी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडेही अडले आहे. सुरुवातीच्या काळात आघाडीच्या नेत्यांचे दौरे यांच्यामुळे बैठका झाल्या नाहीत. नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण हे आघाडीच्या जागावाटप समितीमध्ये होते. त्यांच्याऐवजी आता समितीत कोण सहभागी होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच वंचितने ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. त्याबाबतही आघाडीकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विदर्भात जास्त जागा मिळविण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे. त्यावरूनही आघाडीत रस्सीखेच आहे.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू‌ आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर झाले. या शिबिरात संघटन मजबूत करण्याविषयी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील याबाबत चर्चा झाली आहे. जयंत पाटील यांनी याबाबत सांगितले, शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाच्या वृत्तांबाबत चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो याची माहिती त्यांना दिली आहे. लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतला महाराष्ट्रातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल. शरद पवार व राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in