विधानसभेसाठी ‘मविआ’ची जोरदार मोर्चेबांधणी; जागावाटपाबाबत शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली असून, या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
विधानसभेसाठी ‘मविआ’ची जोरदार मोर्चेबांधणी; जागावाटपाबाबत शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक
Published on

मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली असून, या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतदेखील तयारीच्या दृष्टीने ‘मविआ’ने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही जागांच्या वाटपाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती तयार करून या समितीच्या माध्यमातून चर्चा करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षांना देण्यात येणार आहेत, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमधील ज्या पक्षाची जास्त ताकद असेल, त्या पक्षाला ती जागा सोडली जाणार आहे. या सूत्रानुसार लवकरात लवकर जागांची चाचपणी करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीची रणनीती विधानसभेसाठी वापरणार

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने जागावाटप आणि उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली होती. तर महायुतीने उशीरा उमेदवार जाहीर केल्याने त्याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रणनीती आता विधानसभा निवडणुकीतदेखील वापरण्याचा ‘मविआ’चा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने जागावाटपात आघाडी घेण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in