मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. या यादीत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८ हजार १०६ विद्यार्थ्यांना, तर दंत अभ्यासक्रमाच्या २ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या यादीमध्ये ६० टक्क्यांपर्यंत प्रवेश होण्याची शक्यता असते. कारण काही विद्यार्थी केंद्रीय कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करतात. या विद्यार्थ्यांना जिथे चांगले महाविद्यालय उपलब्ध होईल, त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात. पहिल्या यादीतील अनेक विद्यार्थी ‘अधिक चांगले महाविद्यालय’ हा पर्याय निवडतात.
त्यामुळे दरवर्षी पहिल्या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे ५० ते ६० टक्केच विद्यार्थी पहिल्या यादीत प्रवेश घेतात. या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागा दुसऱ्या फेरीकरिता उपलब्ध होतात.
१ सप्टेंबरपासून सुरू होणार शैक्षणिक सत्र
वैद्यकीय समुपदेशन समितीने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. मात्र पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ होऊ शकेल. त्यामुळे १ सप्टेंबरपासून महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाविद्यालयांना अडचण येऊ शकते.