राज्यात लवकरच 'इतक्या' हजार जागांसाठी मेगाभरती

राज्य सरकारच्या 43 विभागात पावणे तीन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
राज्यात लवकरच 'इतक्या' हजार जागांसाठी मेगाभरती
ANI

राज्य सरकार मोठी मेगाभरती करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने त्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या 43 विभागात पावणे तीन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार 75 हजार पदांची मेघाभरती केली जाणार आहे. 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान ही भरती केली जाणार आहे. राज्य शासनाने या मेगाभरतीचा आराखडा तयार केला असून येत्या 15 ऑगस्ट पर्यंत भरतीच्या जाहीराती प्रकाशित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मेघा भरती करण्याची घोषणा केली होती. तसेच 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ही भरती करणार असल्याचेही सांगितले होते. राज्य सरकारने 20 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतलेल्या बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर असलेले गट- क, ब, आणि ड पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या कंपन्याची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला होता. राज्यात सद्यस्थितीला शालेय शिक्षण, कृषी, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य व गृह, वैद्यकिय शिक्षण, ग्रामविकास, पशुसंवर्धन, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण अशा महत्वपुर्ण विभागात रिक्त जागा वाढल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.

वित्त विभागाने कोरोना काळानंतर भरतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे आता मेगाभरतीच्या मार्गात कोणताही अडथळा नाही. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका, राज्यातील सद्याची परिस्थीती, वाढती बेरोजगारी या पार्श्वभूमीवर मेगाभरती काढावीच लागणार आहे. राज्य सरकार त्या दिशेने पावले उचत असून या भरतीचा कृती आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in