म्हाडा कोकण मंडळाच्या घरांकडे विजेत्यांची पाठ! १ हजार ३७४ अर्जदारांनी केली घरे परत

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीसाठी विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. या लॉटरीत विजयी ठरलेल्या २ हजार १७६ अर्जदारांनी स्वीकारली घरे आहेत, तर तब्बल १ हजार ३७४ विजेत्यांनी घरे परत केली आहेत.
म्हाडा कोकण मंडळाच्या घरांकडे विजेत्यांची पाठ! १ हजार ३७४ अर्जदारांनी केली घरे परत
Published on

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीसाठी विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. या लॉटरीत विजयी ठरलेल्या २ हजार १७६ अर्जदारांनी स्वीकारली घरे आहेत, तर तब्बल १ हजार ३७४ विजेत्यांनी घरे परत केली आहेत. तसेच काही अर्जदारांनी घरे परत करण्यासाठी संगणकीय लिंक खुली करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे घरे परत करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

कोकण मंडळाच्या हद्दीतील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार ३५४ सदनिका व ७७ भूखंड विक्रीची संगणकीय लॉटरी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात आली. या लॉटरीसाठी १ लाख ८४ हजार ९९४ विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी १ लाख ५८ हजार ४२४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून लॉटरीत अर्ज निश्चित केला होता. लॉटरीनंतर आतापर्यंत केवळ २ हजार १७६ अर्जदारांनी घरे स्वीकारली असल्याची माहिती कोकण मंडळातील सूत्रांनी दिली.

तसेच लॉटरीत विजेते ठरल्यानंतर १ हजार ३७४ अर्जदारांनी घरे सरेंडर केली आहेत. तर ५१४ अर्जदारांनी घर स्वीकार की नाही हा संगणकीय पर्याय निवडलेला नाही. त्यामुळे ही घरेही घेण्यास विजेते इच्छुक नसल्याचे दिसत असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

लॉटरीत विजयी झालेल्या अर्जदारांच्या प्रथम सुचना पत्रात अर्जदारांना घरे स्वीकारण्यासाठी १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत घर स्वीकारणे अथवा नाकारण्याचा पर्याय न निवडलेल्या अर्जदारांनी पुन्हा संगणकीय लिंक खुली करण्याची विनंती केली आहे.

मात्र स्वीकृतीसाठी मुदतवाढ दिल्यास प्रतीक्षा यादीवरील अर्जदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामुळे स्वीकृतीसाठी मुदतवाढ न दिल्यास घरे शिल्लक राहतील. आणि या शिल्लक घरांची नव्याने लॉटरी काढण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून मंडळाने स्वीकृतीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. त्यानुसार विजेत्यांना पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीला मुदतवाढ

पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदारांना ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची लॉटरी ११ डिसेंबरला काढण्यात येणार आहे. ४ हजार १८६ घरांसाठी आतापर्यंत १ लाख ८२ हजार ७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ हजार ३३ हजार ८८५ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन संगणकीय लॉटरी ११ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे. मुदतवाढीनुसार अर्जदार ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in