
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (एमएच- सीईटी) सेल यांच्या माध्यमातून रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परीक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांना या प्रश्नांचे गुण द्यावेत. तसेच या परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गणिताच्या ५० प्रश्नांमधील २० ते २५ प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय चुकीचे होते, काही प्रश्नांचे चारही पर्याय चुकीचे होते. पण विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याने त्यांना नाइलाजाने चुकीचे पर्याय निवडावे लागले. याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राकडे तक्रार केली असता त्यांची साधी दखलही घेतली नाही. अशाच प्रकारचा घोळ राज्यातील इतर परीक्षा केंद्रावर झाल्याच्या तक्रारी आहेत. काही परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. पण परिक्षा केंद्राकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत.