

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक असलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६ साठीच्या सीईटी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास लवकरच प्रारंभ होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी अनिवार्य करण्यात करण्यात आला आहे. याबाबत सीईटी कक्षाने परिपत्रक जारी केले आहे.
सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आधार कार्डवरील तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता, वडिलांचे नाव तसेच आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक हे तपशील योग्य आणि अद्ययावत असणे बंधनकारक आहे. आधारशी मोबाईल क्रमांक लिंक व सक्रिय असणे बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सीईटी २०२६ साठी नोंदणी करताना ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री अर्थात अपार आयडी सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेत अपार आयडी तयार करून ठेवावा, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
दरम्यान, सीईटी २०२६ संदर्भातील सविस्तर अधिसूचना, परीक्षा वेळापत्रक आणि पुढील मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जाहीर केल्या जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी राज्य सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी कक्षामार्फत करण्यात आले आहे.
दिव्यांगांना डिसेबिलिटी कार्ड अपलोड करणे बंधनकारक
दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम प्राधिकरणाकडून मिळालेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड अपलोड करणे अनिवार्य करण्यात आला आहे. पुढील सामाईक प्रवेश प्रक्रियेदरम्यान यूडीआयडी आवश्यक ठरू शकत असल्याने, दिव्यांग विद्यार्थ्यांनी यूडीआयडी मिळवावे, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. लेखनिकाची सुविधा घेण्यास पात्र असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना दोन लेखनिकांची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये लेखनिकाचे नाव, आधार क्रमांक, छायाचित्र, बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.