

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यासाठी तसेच नवीन औद्योगिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अतिरिक्त आर्थिक संसाधनांचीआवश्यकता राहणार एमआयडीसीसाठी हा निर्णय घेण्यात आला.
एमआयडीसीला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मान्यता आणि शासन हमी दिली आहे.
सध्या पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रे, विशेष आर्थिक क्षेत्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन सुरू आहे. त्यादृष्टीने महामंडळाच्या कर्ज उभारणीच्या सध्याच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी या अधिनियमातील तरतुदीमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.