एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेपासून आजही लाखो प्रवासी वंचित

कंपनीची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात अद्याप निर्णय प्रलंबित; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल
एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेपासून आजही लाखो प्रवासी वंचित

एसटी महामंडळाने १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस रुग्ण, अपंग, सर्वसाधारण प्रवासी, विविध सेवा पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा या लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. या स्मार्ट कार्ड अंतर्गत एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात सवलत देण्यात येते. मात्र स्मार्ट कार्डचे काम पाहणाऱ्या कंपनीची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात आली असून एसटी महामंडळाने मुदत वाढवून दिल्यानंतरही कंपनीने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा परिणाम म्हणजे प्रवाशांना नवीन स्मार्ट कार्ड मिळू शकत नाही. यामुळे राज्यातील लाखो प्रवासी या सवलतीपासून वंचित राहिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांना एसटी महामंडळाकडून विविध सवलती देण्यात येतात. त्यासाठी स्मार्ट कार्ड ही योजना अंमलात आणली गेली. याचा सर्वाधिक फायदा ज्येतिष नागरिकांना होत आहे. मात्र कोरोनापासून या स्मार्ट कार्ड योजनेमुळे अनेक प्रवासी त्रस्त आहेत. जुलै २०२२ पासून नवीन स्मार्ट कार्डचे काम ठप्पच झाले आहे. हे कार्ड कंपनीकडून एसटी महामंडळाला वितरित करण्यात येते आणि महामंडळद्वारे प्रवाशांना उपलब्ध होते. परंतु हे काम करणाऱ्या कंत्राटदाराची अंतिम मुदत संपल्याने राज्यातील स्मार्ट कार्डची सर्व कामे ठप्प आहेत. त्याच कंपनीला पुन्हा स्मार्ट कार्डचे काम पाहण्याची विनंती करण्यात आली. अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याने नवीन स्मार्ट कार्डसाठी विविध आगार, बस स्थानकात प्रवाशांना खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, या स्मार्ट कार्डची नोंदणी केलेल्या प्रवाशांपैकी ६ लाखांहून अधिक प्रवासी आजही या योजनेपासून वंचित असून यामध्ये ४ लाख १९ हजार २१८ जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर १ लाख ६० हजार १४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

स्मार्ट कार्डचे नोंदणीधारक - ३९ लाख ८४ हजार ५५४

वाटप करण्यात आलेले स्मार्ट कार्ड - ३३ लाख ७४ हजार ५६२

शिल्लक नोंदणीधारक - ६ लाख ०९ हजार ९९२

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in