पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव बुद्रुकनजीक सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
स्वारगेट पुणे ते दापोलीपर्यंत जाणारी खासगी मिनी बस महामार्गावरील पुलाच्या लोखंडी संरक्षक कठड्यांना धडक देत ४५ ते ५० फूट दरीत कोसळली.
गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर ते खेड दरम्यानच्या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक मार्गिका बंद ठेवली आहे.
पहाटे धुके असल्याने लोखंडी संरक्षक कठड्यांना श्रीसाई ट्रॅव्हल्सची मिनी बसची धडक बसताच लोखंडी कठडे तोडून मिनीबस थेट दरीत पडली. यावेळी बसमधील प्रवाशांच्या किंचाळण्यासह बसच्या धडकेमुळे लोखंडी कठडयांचा कर्णकर्कश्य आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि मिनीबसमधील जखमींना महामार्गावर आणले.
पोलादपूर पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करीत जखमींना खेड-कळंबणी येथील रत्नागिरी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले. खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शामल विजय आंजर्लेकर, काजल मारुती शिगवण, दिलीप शिवराम मोहिते, अमरनाथ मिलिंद कांबळे, दिपाली दत्ताराम काचरे, प्रतिक प्रकाश गुरव, प्रिया प्रकाश गुरव, आनंदी बालाजी नाचरे, सर्वेश दीपक गुहागरकर, मुजिब अल्लाबकाश दलाल, मयुरी मारुती शिगवण यांच्यासह चालक, वाहक तसेच इतर ९ प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची फिर्याद नयना स्वप्नील कालेकर यांनी दिली. पोलादपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बामणे यांनी मिनीबस चालक सूरज गागनाथ अलकुंटेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
अपघातस्थळी वाहतूककोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली. थंडी-धुके पसरले असताना महामार्गाचे काम सुरू असताना रिफ्लेक्टर नसलेल्या आणि विना काँक्रीट कमकुवतपणे ठासलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यांमुळे हा अपघात झाला असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक कठडेदेखील कमकुवत झाले आहे.