
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप, टीका होत आहे. तसेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. अखेर शस्त्रक्रियेनंतर तब्बल १० दिवसांनी धनंजय मुंडे थेट उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी अचानक देवगिरी बंगल्यावर पोहोचले होते.
मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचले. दोघांमध्ये सुमारे एक ते दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते, अशी माहिती आहे. नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती नसली तरी मुंडेच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका यावेळी पुन्हा एकदा अजित पवारांनी घेतली. अनौपचारिक बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं समजतंय. त्यामुळे मुंडेंना पवारांकडून पुन्हा एकदा अभय मिळाल्याची शक्यता आहे.
तथापि, या भेटीमागे कोणतेही कारण नाही, पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून नेहमी होते तशीच ही एक साधारण भेट आहे. शासकीय कामकाजाचा तसेच पक्षीय कामकाजाचा हा एक भाग म्हणून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.