
छत्रपती संभाजीनगर : संत तुकाराम मुलांच्या किल्लेअर्क येथील वसतीगृहाची पाहणी करत असताना वसतीगृहातील मुलांनी आपली कैफियत मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर मांडली. यावेळी मंत्री शिरसाट यांना वसतीगृहाची अवस्था कोंडवड्यापेक्षाही वाईट असल्याचे निदर्शनास आले. जेवणात अळ्या, दारे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असल्याचे पाहून मंत्री शिरसाट यांनी वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याप्रकरणी २८ तारखेला पुण्यात समाज कल्याण अधिकाऱ्यांची बैठक होणार असून समाज कल्याण आयुक्तांनी पाहणी करून २६ डिसेंबर रोजी अहवाल देण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी दिले आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संत तुकाराम मुलांच्या शासकीय वसतीगृहास मंत्री शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भेट दिली. एक दिवस आधीच वसतीगृहातील अवस्थेविषयी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळची परिस्थिती पाहून मंत्री संजय शिरसाठ यांनी काही तरी लाज बाळगा, मुले कशा अवस्थेत राहतात, अशा वातावरणात एक दिवस तुम्ही राहून दाखवा, सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरली आहे. मुलांच्या राहण्याच्या जागेत कचरा साचल्याचे पाहून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मस्ती करायला पाहिजे का? पैसे खायचेत का? अशा शब्दांत सामाजिक न्याय विभाग आणि वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सुनावले. यावेळी आक्रमक झालेले मंत्री संजय शिरसाट यांनी याप्रकरणी 'कुणाचीही गय करणार नाही, सक्तीच्या रजेवर पाठवेन,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी मंत्र्यांना वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट पोळ्या, तुटलेल्या तोट्या, बाथरूम, नळ, तुटलेल्या तोट्या, फुटलेल्या काचा, कपड्यांचा आडोसा लावलेल्या खिडक्या, मोडके पलंग विद्यार्थ्यांनी मंत्र्यांना दाखवले. एका खोलीमध्ये कचरा, खरकटे आणि घाण साचलेली होती. तेथे दुर्गंधी सुटली होती. शिरसाट यांनी गृहपालांसह अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
पाणी नाही, निकृष्ट जेवण दिले जाते. पिण्यासाठी पाणी नाही. आम्ही रोज २० रुपये खर्च करून पाण्याची बाटली विकत आणतो. जेवणात अळ्या निघतात.
- अमोल अहिरे, विद्यार्थी
आठशे रुपये भत्ता दिला जातो, पण गेल्या ८ महिन्यांपासून भत्ता मिळालेला नाही, जेवणातही पोळ्या कच्च्या असतात.
- रोहन लोंढे, विद्यार्थी