साताऱ्यातील स्व. बाळासाहेब देसाई स्मारक वादात

पालक मंत्र्यांनी अन्यत्र स्मारक उभारण्याचा आ. शिवेंद्रराजे भोसलेंचा सल्ला
File photo
File photo

सातारा शहरातील पोवई नाका येथील मोकळ्या जागेवर डोळा ठेवत तेथे राज्याचे माजी गृहमंत्री स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक उभारण्याची धडपड पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी सुरू केली आहे. याबाबत सातारा येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही स्मारक असू नये, हे सांगण्यासाठी सातारच्या राजमाता छ. कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेत कडाडून विरोध केला आहे. तसेच या परिसरात दुसरे कोणतेही स्मारक झाले तर जनक्षोभ उसळेल, असा इशाराही राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिला.

त्यावर मी स्वतः सर्व संबंधितांशी बोलेन. सातारा शहरात शिवतीर्थ पोवई नाका परिसरात शिवप्रेमींच्या भावना विचारात घेऊनच निर्णय होईल. आपण निश्चित राहा, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता छ. कल्पनाराजे भोसले यांनी दिली.

दरम्यान,पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रस्तावित स्मारक होणारच असा हट्ट जाहीर केला आहे. एकीकडे राजमाता यांचा निर्वाणीचा इशारा, तर दुसरीकडे शनिवारी साताऱ्याचे भाजपचे आ. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही पालक मंत्री देसाई यांनी आपल्या आजोबांचे स्मारक पोवई नाका येथे न उभारता ते अन्य ठिकाणी उभारावे, असा सल्ला दिला आहे. साताऱ्यातील अनेक व्यक्ती, संस्था, संघटनानेही पोवई नाका येथे अन्य कोणतेही स्मारक होऊ दिले जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने हे स्मारक चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

सातारच्या राजमाता छ. कल्पनाराजे भोसले यांनी सातारा येथील पोवई नाका या ठिकाणी शिवाजी सर्कल आहे. अलीकडे या भूमीला शिवप्रेमींनी शिवतीर्थ असे नाव दिले आहे. याच परिसरात पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा, चौक सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला सातारकरांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपती घराण्यातील कर्तृत्ववान राजांच्या व्यतिरिक्त त्या परिसरात कोणाचेही पुतळे व स्मारक उभे होऊ देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर जनक्षोभ उसळेल, अशी माहिती राजमाता छ. कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच साताऱ्यातील शिवप्रेमी व सामाजिक संघटना या विषयात आक्रमक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकभावनेचा विचार आपण केला पाहिजे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

यावेळी शिवप्रेमींची भावना व लोकभावना विचारात घेऊन पोवई नाक्यावरील निर्णय होईल. त्या संदर्भात आपण स्वतः सर्व संबंधितांशी बोलू, असे मुख्यमंत्र्यांनी आपणास सांगितल्याचे राजमाता छ. कल्पनाराजे भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे राजमातांनी कडवा विरोध केला असतानाच साताऱ्याचे भाजप आमदार व छ. शिवाजी महाराजांचे एक वंशज छ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही या स्मारकाला विरोध करत पालक मंत्री देसाई यांनी आपल्या आजोबांचे स्मारक अन्य ठिकाणी उभारावे, असा सल्ला दिला. पोवई नाक्यावर स्मारक उभारल्यास त्याला विरोध केला जाईल व तेथे छ. शिवाजी महाराजांशिवाय अन्य कोणतेही स्मारक उभारू दिले जाणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे पालक मंत्र्यांनी हे स्मारक होणारच असे ठणकावून जाहीर केल्याने त्यांचा हा हट्ट व त्याला होणारा विरोध याचा अंतिम निष्कर्ष काय निघणार हे नजीकच्या भविष्यकाळातच कळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in