
मुंबई : हिंदी सक्तीविरोधातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी-अमराठीचा मुद्दा मीरा-भाईंदरमध्ये तापलेला असतानाच, मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा मराठीचा जनक्षोभ पाहायला मिळाला. मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जवळपास हजारो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. अखेर पोलिसांच्या दबावाला न जुमानता मराठी माणसांनी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो मराठीजनांसह शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
यावेळी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढलेला चालतो, मात्र मराठी माणसांनी परवानगी मागूनही मराठी माणसाचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी माणसांची धरपकड केली जाते, तसेच बंदोबस्ताची भीती आणि दबाव पोलिसांनी टाकल्याचा आरोप मंगळवारच्या मराठी मोर्चादरम्यान केला गेला.
मराठी भाषेवरून मनसैनिकांनी मीरारोडच्या बालाजी हॉटेलसमोरील ‘जोधपूर स्वीट’च्या मालकास मारले होते. व्यापाऱ्यांनी त्या विरोधात मोर्चा काढत मराठी माणसांना अद्दल घडवण्याची भाषा केली होती. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यापाऱ्यांचे समर्थन करत पाठिंबा दिला होता. याचा निषेध करण्यासाठी व मराठी माणूस आणि भाषेच्या सन्मानासाठी विविध पक्ष, संघटना आदींनी मोर्चाचा इशारा दिला होता. परंतु, पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रमुख मराठी माणसांना नोटीस बजावत त्यांची मध्यरात्री धरपकड सुरू केली होती. मोर्चास्थळी सकाळपासूनच मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चासाठी येणाऱ्या प्रत्येकाची बळजबरीने धरपकड करत पोलीस त्यांना पकडून नेत होते. पोलिसांनी सकाळपासून सुमारे दीड हजार मराठी माणसांना दांडगाई करून बस, व्हॅनमध्ये टाकून पकडून नेले होते. तरीही मोर्चासाठी हजारो मराठी माणसे जमत होती. पोलिसांच्या दडपशाही आणि अन्याय वागणुकीचे व्हिडीओ, बातम्या सर्वत्र झळकताच त्याचा सर्व स्तरातून निषेध सुरू झाला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने मराठी माणसांचा जमाव आला व पोलिसांचा बंदोबस्त आणि दांडगाई झुगारून मराठी माणसांनी मोर्चा काढला.
कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता फक्त मराठी माणूस हा छत्रपती शिवरायांच्या झेंड्याखाली एकत्र जमला होता. मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांचा अपमान कदापिही सहन करणार नाही, अशी मागणी आंदोलक करत होते. एका घटनेवरून राजकीय फायदा आणि मराठी द्वेषातून मारवाडी व्यापारी विरुद्ध मराठी माणूस अशी आग लावण्याचे काम भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केल्याचा आरोप करत मेहतांविरोधात मोर्चात घोषणाबाजी करण्यात आली.
सदरील मोर्चाची सांगता मीरारोड रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली, त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आले असता त्यांना मराठीविषयी कोणतीही भूमिका न घेतल्याचा जाब विचारण्यात आला. सरनाईक यांच्या दिशेने एकाने पाण्याची बाटली भिरकावली. त्यानंतर ‘जय गुजरात’, ‘५० खोके एकदम ओके’, ‘सरनाईक गो बॅक’ अशा घोषणा करण्यात आल्या, त्यानंतर सरनाईकांनी मोर्चातून काढता पाय घेतला.
यावेळी मोर्चामध्ये शिवसेना नेते राजन विचारे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, संदीप राणे, प्रभाकर म्हात्रे, मनोज मयेकर यांच्यासह हजारो लोक सहभागी झाले होते.
पोलिसांच्या दादागिरीवर सरनाईकांचा संताप
मी मंत्री, आमदार म्हणून नव्हे एक मराठी माणूस म्हणून मोर्चात सामील झालो. पोलिसांच्या सापत्न वागणुकीमुळे व मराठी माणसाला केलेल्या दडपशाहीविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. हे पोलीस कोणाचा अजेंडा चालवत होते? असा सवाल करत अशा मुजोर मराठीद्वेष्ट्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानंतर सरनाईक यांनी पोलिसांनी पकडून ठेवलेल्या अनेक मराठी माणसांना पोलीस ठाण्यातून सोडवून आणले.
दादागिरी करायची नाही - संदीप देशपांडे
“ठाणे मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. अविनाशची काय चूक होती? व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्याला परवानगी दिली. त्या मोर्चात भाजपवाले होते. मग आता आम्ही मोर्चा काढला. व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला ना? मग आम्हाला का अडवले?, दोन हजार मैलांवरून इथे येऊन दादागिरी नाही करायची. इथे काय होणार ते मराठी माणूस ठरवणार. धंदा करायला आलात ना, मग धंदा करा. इथल्या राजकारणात लुडबूड करायची नाही. इथे येऊन माज नाही दाखवायचा,” अशा शब्दांत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता इशारा दिला.
...तर मराठी माणूस रस्त्यावर येईल -अविनाश जाधव
पोलिसांनी दबाव टाकल्यानंतरही मराठी माणूस एकवटला, हा संदेश पूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मराठी माणसावर दबाव टाकण्यात येईल, तिथेच मराठी माणूस रस्त्यावर येईल. याच्यापुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागला, तर त्यांनी यापुढे आम्ही एकत्र होणार, हे लक्षात ठेवावे. मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस १२ ते १५ टक्के असल्याचे येथील भाजप आमदार सांगतो. मात्र तेवढेही तुम्हाला पुरून उरतील. यापुढे आमच्या नादाला लागायचे नाही. मराठी माणूस कोणाचे ऐकणार नाही, अशा शब्दांत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सुनावले.
मराठीचे प्रेम असेल तर सरकारमधून बाहरे पडा - राजन विचारे
हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या भूमीमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. प्रताप सरनाईक यांना या मोर्चातून हाकलवून लावण्यात आले. मात्र त्यांना जोड्याने मारायला हवे होते. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, असे आवाहन ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केले.
सरनाईकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हेसुद्धा मराठी स्वाभिमान मोर्चात सहभागी झाले. शांतपणे सुरू असलेल्या या मोर्चातील वातावरण सरनाईकांना पाहताच चिघळले. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘५० खोके एकदम ओके’, ‘जय गुजरात’, ‘सरनाईक गो बॅक’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी काहीशी धक्काबुक्कीही झाली. हा प्रकार पाहून प्रताप सरनाईक यांनी काही वेळातच मोर्चातून काढता पाय घेणे पसंत केले.
मराठीसाठी बोटचेपी भूमिका नाही, त्यासाठी एकवेळा नाही तर ५० वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. पण मराठीचा अपमान कदापि सहन करणार नाही. मराठी भाषेचा आदर हा झालाच पाहिजे. पण महाराष्ट्रात जर पोलीस अशा पद्धतीने वागत असतील तर चांगले नाही. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला मोकळे रान होते, पण आम्हाला नाही.
गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
...म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली - फडणवीस
“राज्यात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो. मीरा-भाईंदरमध्ये मनसेला मोर्चा काढण्यासाठी मार्ग आखून दिला होता. मात्र, मनसेने तो मार्ग नाकारला म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.
राड्यासाठी फडणवीस जबाबदार - सुप्रिया सुळे
मीरा-भाईंदरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसाठी सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार सशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.