मिसिंग लिंकचा घातला घाट.. वाहतुकीची लागली वाट; द्रुतगती मार्गावर १५ किमीच्या लांब रांगा

एकीकडे वाहतूककोंडी संपवण्यासाठी मिसिंग लिंकचा घाट घातला तीच वाहतूककोंडी उद्घाटनाच्या दिवशी दत्त म्हणून हजर झाली.
मिसिंग लिंकचा घातला घाट.. वाहतुकीची लागली वाट; द्रुतगती मार्गावर १५ किमीच्या लांब रांगा
मिसिंग लिंकचा घातला घाट.. वाहतुकीची लागली वाट; द्रुतगती मार्गावर १५ किमीच्या लांब रांगा
Published on

मुंबई : एकीकडे वाहतूककोंडी संपवण्यासाठी मिसिंग लिंकचा घाट घातला तीच वाहतूककोंडी उद्घाटनाच्या दिवशी दत्त म्हणून हजर झाली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी तब्बल १५ किलोमीटर लांब वाहतूककोंडी झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोणावळा घाट परिसरात वाहनचालक पाच ते सहा तास अडकून पडले होते. यामुळे जनसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची दखल घेऊन खुद्द मुख्यमंत्र्यांनाही याबाबत माफी मागावी लागली.

शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेली ही कोंडी दुपारपर्यंत कायम होती. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक फिरायला बाहेर पडल्याने खालापूर टोल नाक्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांचा ओघ वाढला. कडाक्याच्या उन्हामुळे घाटात १० ते १२ गाड्या एकामागून एक बंद पडल्या. त्यामुळे मागच्या वाहनांचा खोळंबा झाला. लहान मुले आणि वृद्धांना उन्हाचा मोठा तडाखा बसला. चार्जिंग संपण्याच्या भीतीने इलेक्ट्रिक वाहन चालकांना एसी बंद करून ताटकळत उभे राहावे लागले.

दरम्यान, मिसिंग लिंक उद्घाटन कार्यक्रम व त्यासाठीच्या नेत्यांच्या ताफ्यामुळे महामार्गाचा अर्धा भाग बंद होता व म्हणूनच ही कोंडी झाली असा आरोप अनेकांनी केला. १ मे रोजीच हा मार्ग खुला केला असता तर वाहतूक वळवता आली असती, पण सरकारला जनसेवेपेक्षा 'फोटो इव्हेंट'मध्ये जास्त रस होता, अशी टीका अनेकांनी केली.

महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले की, "सलग सुट्ट्यांमुळे सकाळी वाहनांची मोठी गर्दी होती, मात्र दुपारनंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली."

मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

उद्घाटनाच्या दिवशीच शाळांच्या सुट्ट्या आणि 'लाँग विकेंड'मुळे खालापूर आणि खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच अनेक प्रवासी अडकून पडले होते. या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान जनतेची माफी मागितली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूककोंडी संदर्भातील व्हिडीओचा संदर्भ देत त्यांची व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. "सुप्रिया ताई, तुम्ही आज वाहतूककोंडीत अडकलात त्या शेवटच्या, आता 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यामुळे यापुढे तुम्हाला किंवा इतर कोणत्याही प्रवाशावर घाटात ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. "यापूर्वीच्या सरकारने हा प्रकल्प रोखला होता, पण आता तो पूर्ण झाल्यामुळे सुळे यांना पुन्हा अशा त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

logo
marathi.freepressjournal.in