राजा माने/मुंबई : महायुतीच्या माध्यमातून भाजपने मिशन ४५ चे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्धार केला असून, ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी विदर्भातील अधिकाधिक जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये तब्बल ६ तास खलबते झाली. या बैठकीत राज्यातील सर्वच मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आणि विशेषत: विदर्भातील सर्वच्या सर्व जागा कशा जिंकता येतील, यासाठी विशेष मंथन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी केली आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजने राज्यात मजबूत स्थितीत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि बड्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवत राज्यात महायुतीचे भक्कम सरकार असल्याचे दाखवून दिले. याच्या जोरावर भाजपने मिशन ४५ वर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात कोणत्याही परिस्थितीत भाजपला ४८ पैकी ४५ जागा जिंकून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर आरूढ करण्याचे भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे भाजप आतापासूनच कामाला लागला असून, राज्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेतानाच राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मजबुतीने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच सध्या भाजपचे बैठकांचे सत्र सुरू आहे.
या अगोदर रविवारी पुण्यात आढावा बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच उपराजधानी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक पार पडली. ही बैठक सकाळी सुरू झाली होती. तब्बल ६ तास ही बैठक चालली. या बैठकीत राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांचा धावता आढावा घेतला आणि विशेषत: विदर्भातील लोकसभेच्या सर्वच जागांचा सखोल अभ्यास करतानाच सर्वच जागांवर विजय कसा मिळविता येईल, यावर मंथन केले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत सद्यस्थिती आणि बदलते समीकरणे यावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल ६ तास हे मंथन झाल्याने या बैठकीला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.