लोकसभेतील चूक विधानसभेत नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शहांना विनंती

....त्यामुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणले.
लोकसभेतील चूक विधानसभेत नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शहांना विनंती
एएनआय
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवार जाहीर करण्यात महायुतीला उशीर लागला होता. तसा विलंब आता विधानसभा जागावाटपावेळी होऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना केली. मंगळवारी रात्री उशिरा भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावर भर दिला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीतील जागावाटपाची चर्चा अनेक दिवस सुरू होती. अनेक उमेदवारांची उमेदवारी ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आल्याने त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्याचा फटका निवडणुकीत बसल्याचे महायुतीच्या नेत्यांनी मान्य केले होते. नाशिकमधून हेमंत गोडसे, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव आणि मुंबई उत्तर-मध्यमधून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस उजाडला होता. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणले.

या बैठकीत इतर मुद्यांवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना पक्षाला विधानसभेच्या किती आणि कोणत्या जागा द्यायच्या याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. सरकारी योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर द्यावा, असा सल्ला अमित शहा यांनी दिला. ‘लाडकी बहीण’ योजनेचाही यात आवर्जून उल्लेख करण्यात आला. याशिवाय, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसावेत, असे सांगत सर्वांनी अंतर्गत वाद टाळून एकजुटीने निवडणूक लढवावी, असे शहा यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दसऱ्यापर्यंत जागावाटप पूर्ण होणार - शिरसाट

भाजप १६०, शिवसेना १०० आणि राष्ट्रवादीने ८०-९० जागांची मागणी केली आहे. यात कोणाला किती जागा मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीचेही जागावाटप दसऱ्यापर्यंत पूर्ण होईल, असे शिवसेना प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in