महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.
महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर

प्रतिनिधी/मुंबई

महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे, महिला आयोगाच्या कार्यालयातच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पक्ष प्रचाराचे काम करून पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.पक्ष प्रचाराचे काम वरिष्ठाच्या दबावाखाली करावे लागत आहे का, हे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले पाहिजे. चाकणकर या दडपणाखाली पक्ष प्रचाराचे काम करत असतील तर ते अयोग्य व चुकीचा पायंडा पाडणारे व असंवैधानिक आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे कार्यालय आहे त्या कार्यालयातून राजकीय प्रचाराचे काम व्हायला नको. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून रुपाली चाकरणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याचे संध्याताई सव्वालाखे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in