आमदार अनिल बाबर यांचे निधन

पाणीदार आमदार म्हणून ओळख असलेले खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे बुधवारी सकाळी आकस्मित निधन झाले.
आमदार अनिल बाबर यांचे निधन

विटा (सांगली) : पाणीदार आमदार म्हणून ओळख असलेले खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे बुधवारी सकाळी आकस्मित निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंगळवारी दुपारी सांगलीतील उषःकाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तथापी, बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांना बंडात खंबीरपणे साथ दिली. गुवाहाटीवारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. १९९० पासून अनिल बाबर यांनी चार वेळा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवले. खानापूर तालुक्यातील गार्डी गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. टेंभू सिंचन योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ३ ऑगस्ट २०२२ रोजी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई यांचे निधन झाले होते. अठरा महिन्यांत अनिल बाबर यांचेही आकस्मित निधन झाल्याने खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिलभाऊ बाबर यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार बाबर कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. बुधवारी दुपारी ४ वाजता विटा येथील जीवन प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री सुरेश खाडे, आमदार जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत अनिलभाऊ बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विश्वासू सहकारी गमावला-मुख्यमंत्री

‘‘प्रामाणिक विश्वासू सहकारी तसेच कुटूंबातील सदस्य आम्ही गमावला आहे. संघर्षाच्या काळात आमदार अनिलभाऊ बाबर सोबत उभा राहिले. त्यामुळे आम्हाला लढण्याचे बळ मिळाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यात गेलो तरी आमदार अनिलभाऊ बाबर यांचे कार्यकर्ते भेटतात. मतदारसंघासाठी त्यांनी खूप काम केले. सर्वसामान्य माणसाला न्याय कसा द्यावा, हे शिकवणारा आदर्श नेता, जनतेचे प्रचंड प्रेम लाभलेला नेता ही अनिलभाऊंची ओळख आहे.’’ -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

logo
marathi.freepressjournal.in