आमदार अपात्रतेचा निकाल तयार? अभिप्रायासाठी मसुदा दिल्लीतील तज्ज्ञांकडे

आमदार अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीत सातत्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला होता.
आमदार अपात्रतेचा निकाल तयार? अभिप्रायासाठी मसुदा दिल्लीतील तज्ज्ञांकडे

राजा माने/मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला सुरू होता. या खटल्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून, आता निकालपत्रही तयार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० जानेवारीपर्यंत याबाबत निकाल देणे आवश्यक आहे. त्यामुळे या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभ्यासासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे १० जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी भेट घेतली होती, असे सांगण्यात येत आहे.

आमदार अपात्रतेसंबंधीच्या सुनावणीत सातत्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. मात्र, न्यायालयाने सातत्याने फैलावर घेऊनही सुनावणीला वेग येत नव्हता. अखेर सुप्रीम कोर्टाने निकालाची मुदत ठरवून दिल्याने विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला वेग आला. त्यानुसार २० डिसेंबरला सुनावणी पूर्ण झाली. परंतु, निकालपत्रासाठी वेळ लागत असल्याचे कारण पुढे करीत ३१ डिसेंबरची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यामुळे आता १० जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्र तयार केल्याचे समजते.

शिवसेनेत फूट पडल्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निकाल आला आहे, तो निकाल पाहता विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे हा निकाल ऐतिहासिक असेल. परंतु राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतात, यावर पुढील राजकीय गणिते ठरणार आहेत. यातून ठाकरे गटाला धक्का बसतो की शिंदे गटाला, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान चर्चा?

निकाल अभिप्रायासाठी पाठविण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. कारण राहुल नार्वेकर रविवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते आणि त्यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली होती. ही भेट पाहता निकालातून शिंदेंची बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीने तर पाऊल टाकले गेले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाल्यास न्यायालयीन लढाई अटळ आहे.

निकाल जाहीर करणार?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंबंधीचे निकालपत्र कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठविले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीचा विचार न करता आजच (मंगळवारी) निकाल जाहीर करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या निकालाकडे अवघ्या

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in