आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढणार; आणखी एक गुन्हा दाखल

आमदारांसह सात जणांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांनी जातीचा उल्लेख करत तुम्ही कधी सुधारणार नाही असे म्हटले होते. तसेच, तुम्हाला आम्ही कधी पुढे जाऊ देणार नाही. तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही तुमच्या...
आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढणार; आणखी एक गुन्हा दाखल

कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्यातून उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गायकवाड यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गायकवाड यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

कल्याणच्या द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आमदार गायकवाड यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप जागा मालकाने केला. त्यांच्या तक्रारीवरुन गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नीता एकनाथ जाधव यांनी याबाबतची तक्रार दिली असून त्यात त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर आरोप केले आहेत. आमदारांसह सात जणांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांनी जातीचा उल्लेख करत तुम्ही कधी सुधारणार नाही असे म्हटले होते. तसेच, तुम्हाला आम्ही कधी पुढे जाऊ देणार नाही. तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीकरता कोणत्याही कोर्टात जा, असेही ते म्हणाले.

तसेच, 31 जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाउंड करण्याचे काम सुरु केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in