
भाजपचे (BJP) पिंपरी चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची आज प्राणज्योत मालवली. (MLA Laxman Jagtap passed away) गेले अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाची लढा देत होते. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने पुण्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. आज सकाळी त्यांनी ५९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
लक्ष्मण जगताप यांची काही दिवसांपूर्वी आजारावर मात केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले गेले होते. पण, दिवाळीनंतर त्यांची तब्येत बिघडल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अखेर त्यांची झुंज संपुष्टात आली. त्यांनी आजारी असतानाही आमदार म्हणून अनेक कर्तव्ये पार पाडली. विशेष म्हणजे, जून २०२२मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी त्यांचे एक मत महत्त्वाचे होते. त्यासाठी लक्ष्मण जगताप यांनी रुग्णवाहिकेतून प्रवास करत मुंबईला येऊन आपले कर्तव्य पार पाडले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर आभारदेखील मानले होते.