आमदार लंकेंच्या हाती तुतारी? अजित पवारांवर उलटवला गेम

लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असता तर अजित पवारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत त्यांच्यावर कारवाई केली असती. तसे झाले असते तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकते. हे ध्यानात घेऊन...
आमदार लंकेंच्या हाती तुतारी? अजित पवारांवर उलटवला गेम
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे गुरुवारी थेट पुण्यात दाखल झाले आणि तेथे शरद पवार यांच्या उपस्थितीत कोविडशी संबंधित त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी मी नेहमी शरद पवार यांच्या विचारधारेवरच काम करत आलो आहे. आम्हा सर्वांचे सर्वेसर्वा साहेबच असतील. ते देतील तो आदेश मान्य असेल. असे सांगत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच धक्का दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आमदार निलेश लंके अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सामील झाले होते. मतदारसंघासाठी लागणाऱ्या निधीचे गणित लक्षात घेऊन ते सत्तेसोबत गेले. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीअगोदर ते गुरुवारी शरद पवार यांच्या गोटात सामील झाले. त्यांनी प्रथम गुरुवारी दुपारी पुण्यातील पक्ष कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर रितसर पत्रकार परिषद पार पाडली. परंतु, यात निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेशच केला नसल्याचे समोर आले. फक्त त्यांना तुतारी भेट देण्यात आली. शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या खेळीची सव्याज परतफेड करीत अजितदादा गटाकडून आजपर्यंत खेळण्यात आलेल्या कायदेशीर डावपेचांना त्याच भाषेत उत्तर दिले.

लंकेंचा पक्षप्रवेश तूर्त लांबणीवर

दरम्यान, निलेश लंके हे शरद पवारांना भेटले असले तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरीत्या पक्षप्रवेश झालेला नाही. लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असता तर अजित पवारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत त्यांच्यावर कारवाई केली असती. तसे झाले असते तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकते. हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांचा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. आगामी काळात कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील, असे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in