आमदार आवाडेही उतरणार मैदानात; धैर्यशील मानेंना धक्का : कोरे, यड्रावकरांची साथ?

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तथा शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. त्यामुळे...
आमदार आवाडेही उतरणार मैदानात; धैर्यशील मानेंना धक्का : कोरे, यड्रावकरांची साथ?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तथा शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. त्यामुळे माने यांना हटविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे माने यांची उमेदवारी कायम राहिली. यामुळे महायुतीत धुसफूस सुरूच होती. अखेर भाजपसोबत असलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावत लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना धक्का बसला आहे. आवाडे मैदानात उतरल्यास येथे पंचरंगी लढत होऊ शकते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा करताच आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनीच मैदानात उतरण्याचे संकेत दिले होते. येथे शिवसेना ठाकरे गटाने सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील मानेविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात लढत होईल, असे वाटत होते. परंतु माजी खासदार शेट्टी यांनी महाविकास आघाडीशी जुळवून घेतले नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार मैदानात उतरविला. त्यानंतर तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. त्यात वंचितनेही येथे उमेदवार उतरविला आहे आणि आता आमदार प्रकाश आवाडे यांनी मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने येथे आता पंचरंगी लढत रंगणार आहे. या लढतीत धैर्यशील माने यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपची साथ सोडत मैदानात उतरण्याची घोषणा केली. तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर आणि महायुतीसोबत असलेले जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्यासमवेत बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे या मतदारसंघात वजन असलेल्या या दोन नेत्यांची साथ त्यांना मिळू शकते. तसे झाल्यास धैर्यशील माने यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

माझा मोदींना पाठिंबा!

आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीतून बाहेर पडत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. परंतु आपण निवडणूक लढवून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊ, असे जाहीर केले. या मतदारसंघात मी स्वत: परिचित आहे आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माझे राज्यात काम आहे. याचा फायदा निवडणुकीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in